कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)कडून दोन महत्त्वपूर्ण सुविधा जाहीर करण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे प्रवास अधिक सोयीचा, नियोजनबद्ध आणि किफायतशीर होणार आहे.
राजमार्ग यात्रा अॅपमध्ये नवीन टोल तुलना फीचर
NHAI लवकरच ‘राजमार्ग यात्रा’ या मोबाईल अॅपमध्ये टोल तुलना करण्याचे नवीन फीचर सुरू करणार आहे. या फीचरच्या मदतीने तुम्हाला दोन शहरांमधील वेगवेगळ्या मार्गांचे टोल शुल्क सहजपणे पाहता येणार आहे. यामुळे कमी टोल लागणारा मार्ग निवडता येईल आणि प्रवास खर्चात बचत होणार आहे.
हे फीचर कसं काम करेल ?
जेव्हा तुम्ही अॅपवर तुमच्या प्रवासाचा मार्ग शोधाल, तेव्हा अॅप विविध पर्याय दाखवेल. प्रत्येक मार्गासाठी टोल शुल्क स्पष्टपणे दिलं जाईल आणि सर्वात कमी टोल असलेला मार्ग ‘हायलाइट’ केला जाईल.
उदाहरणार्थ, जर तुम्हाला दिल्लीहून लखनऊला जायचं असेल, तर यमुना एक्सप्रेसवे, गाझियाबाद-अलिगढ-कानपूर महामार्ग, मुरादाबाद-बरेली-सीतापूर कॉरिडॉर असे पर्याय दिसतील. त्यातील सर्व मार्गांच्या टोल शुल्काची तुलना करता येईल आणि सर्वात कमी खर्चाच्या मार्गाचा निवड करता येईल.
राजमार्ग यात्रा अॅप कसा मिळवायचा ?
-
अँड्रॉइड युजर्स : गुगल प्ले स्टोअरवर ‘Rajmarg Yatra’ अॅप उपलब्ध
-
आयफोन युजर्स : अॅपल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल
ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास
यासोबतच, NHAI ने आणखी एक महत्त्वाची सुविधा जाहीर केली आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून फास्टॅग वापरकर्त्यांसाठी ३,००० रुपयांचा वार्षिक पास उपलब्ध होणार आहे.
वार्षिक फास्टॅग पासची वैशिष्ट्ये :
- ३,००० रुपयांचा वार्षिक पास
- कोणत्याही NHAI टोल प्लाझावर २०० वेळा प्रवासासाठी शुल्कमुक्त सुविधा
- पास फक्त NHAI टोल प्लाझावर लागू, राज्य सरकारच्या टोल प्लाझावर लागू होणार नाही
- २०० फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर पास पुन्हा रिचार्ज करावा लागेल
- पास एक वर्षासाठी वैध असेल
तुम्ही NHAI च्या अधिकृत वेबसाइटवर https://nhai.gov.in किंवा ‘राजमार्ग यात्रा’ अॅपद्वारे या पाससाठी अर्ज करू शकता.
—————————————————————————————-



