कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्राची व्याख्या करताना वारीला आणि संताना वगळून व्याख्या करता येणार नाही. वारी ही खूप जुनी परंपरा आहे. परंतु पालखी ही वारीसारखी जुनी परंपरा नाही. पालख्या संताच्या पादुका घेऊन पंढरपूरला जातात. १६८५ मध्ये तुकाराम महाराजांचे तिसरे चिरंजीव नारायण महाराज यांनी प्रथम पालखी सोहळा सुरु केला.
जगदगुरु नारायण महाराज यांनी सुरु केलेला पालखी सोहळा म्हणजे वारीचा टर्निंग पाईंट म्हणता येईल. त्यांनी वेगवेगळ्या गावावरुन जाणाऱ्या सर्व दिंड्या एकत्र केल्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका घेतल्या. तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुका घेतल्या. त्या दोन्ही पादुका घेऊन पालखी पंढरपूरकडे निघाली. त्या वेळी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यात घालून नेल्या जात होत्या. दोन्ही पादुका एकाच पालखीत जाऊ लागल्या. त्यामुळेच ज्ञानोबा-तुकोबा हे भजन सुरु झाले.
१६८५ पासून १४७ वर्षे या पद्धतीने पंढरपूरला पालखी जात होती. त्यानंतर १८३२ मध्ये दोन्ही पालखी सोहळे विभक्त झाले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पादुका वेगवेगळ्या पालखीतून वेगवेगळ्या मार्गाने जावू लागल्या. आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो संतांच्या-सत्पुरुषांच्या पालख्या आता पंढरीस येतात.
महाराष्ट्रातून निघणाऱ्या महत्वाच्या पालख्या –
राज्यभरातून २०० ते २५० पालख्या पंढरपूरला जातात. अनेक पालख्यांना संतांची नावे आहेत. पालख्यांसोबत चार ते पाच लाख वारकरी पायी पंढरपूरला जातात.
संत निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा : संत ज्ञानेश्वर यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ. ते ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत. त्यांनी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. त्यांच्या समाधी मंदिरातून पालखी निघते.