मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
त्रिभाषा सूत्राअंतर्गत हिंदीची सक्ती थोपवण्याच्या विरोधात ठाकरे बंधूंनी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ५ जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे संयुक्तपणे मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत. गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून, याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
या मोर्चाची घोषणा करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, ” या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा असणार नाही. हा फक्त आणि फक्त मराठी माणसाचा अजेंडा आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता टिकवण्यासाठीच हा लढा आहे.” त्यांनी सर्वपक्षीय नागरिकांना, साहित्यिक, कलाकार, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वच मराठी भाषा प्रेमींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या मोर्चाला आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने देखील अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. महामंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी संयुक्त निवेदनाद्वारे सांगितले की, “मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून, ती आपली ओळख, संस्कृती आणि अस्मिता आहे. शिक्षण व्यवस्थेत हिंदीची सक्ती म्हणजे मराठीवर अन्याय आहे, त्यामुळे आम्ही ठाकरे बंधूंच्या या आंदोलनाला ठाम पाठिंबा देतो.“
राज्यात सध्या त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणी विरोधात मराठी प्रेमींमध्ये संतापाची लाट असून, या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा हा संयुक्त मोर्चा राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्वाचा ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांत ठाकरे कुटुंबीयांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याचे चित्र होते. मात्र, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याने, याकडे सर्वच स्तरातून लक्ष वेधले जात आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या मोर्चामुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. ५ जुलै रोजी सकाळी गिरगाव चौपाटी येथून मोर्चाला सुरुवात होणार असून, आझाद मैदान येथे निष्कर्ष सभा होईल.