कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार २७ जून रोजी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संबंधित संकेतस्थळाला वारंवार भेट दिली, तरी गुणवत्ता यादी कुठेच दिसली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी पसरली होती.
रात्री उशिरा संचालनालयाने माहिती देत यादी ३० जून रोजी जाहीर होणार असल्याचे सांगितले. यानुसार, अकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया आता १ जुलै ते ७ जुलैदरम्यान पार पडणार आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रवेश प्रक्रियेत गोंधळ, उशीर व तांत्रिक अडचणी जाणवत आहेत. शिक्षण विभागाने वेळेत नियोजन करून विद्यार्थ्यांना वेळेवर प्रवेश मिळावा याची हमी द्यावी, अशी मागणी पालक व शैक्षणिक क्षेत्रातून जोर धरत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यातील सुमारे १२.५ लाख विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशप्रक्रिया अडचणीत आली आहे.
शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी प्रवेश प्रक्रिया प्रणालीत महाविद्यालयांची विविध शाखानिहाय कटऑफ दिसत नसल्याची तांत्रिक अडचण सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे असे सांगितले.
अकरावी प्रवेश प्रक्रिया दरवर्षी लांबत असल्याने यंदा दहावीची परीक्षा आणि निकाल नेहमीपेक्षा लवकर जाहीर करण्यात आला. मात्र केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला १० जून रोजी जाहीर होणाऱ्या यादीला २६ जूनची तारीख मिळाली. आता ही यादी मूळ वेळापत्रकापेक्षा तब्बल २० दिवसांनी म्हणजे ३० जून रोजी प्रसिद्ध होण्याची चिन्हे आहेत.
———————————————————————————–



