पन्हाळा : प्रतिनिधी
पन्हाळा गडावरील हरिहरेश्वर मंदिर परिसरामध्ये बेकायदेशीर उत्खनन केले आहे. या उत्खननामुळे त्याठिकाणी मोठे खड्डे तयार झाले असून मंदिराला धोका निर्माण झाला आहे. बेकायदेशीर उत्खनन त्वरित थांबवून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पन्हाळा गडावरील हरिहरेश्वर मंदिर परिसरामध्ये बेकायदेशीर उत्खनन झाले आहे. या उत्खननामुळे त्याठिकाणी मोठे खड्डे तयार झाले असून मंदिराला धोका निर्माण झाला आहे. व्यावसायिक बांधकामासाठी उत्खनन सुरू आहे या उत्खननाकडे मात्र जाणीवपूर्वक शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे. या उत्खननामुळे ऐतिहासिक वास्तूला हानी पोहोचत आहे. मागील काही वर्षापासून पन्हाळा किल्ल्यावर सातत्याने भूस्खलन होत असून त्यामुळे अनेकदा पन्हाळा किल्ल्यावरचा प्रवेश काही महिन्यांसाठी बंद ठेवावा लागला होता.
भूस्खलन झालेल्या रस्त्याच्या शंभर मीटर अंतरावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गौण खनिज उत्खनन चालू आहे. पन्हागडावरील बेकायदेशीर उत्खनन त्वरित थांबवून संबंधित व्यक्ती आणि संस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पन्हाळ्याचे तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शैलेश हिर्डेकर, उपाध्यक्ष स्वानंद पाटील,मारुती सुतार,शरद मोरे, शिवराज पाटील, रमेश तांदळे,वैभव हिर्डेकर,लक्ष्मण सुतार आदी उपस्थित होते.






