राधानगरी /कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. आज (२४ जून) संध्याकाळी वाजेपर्यंत नदीची पातळी ३० फूट १० इंच इतकी नोंदवली गेली आहे. ही पातळी धोका निर्देशांक ओलांडून नदी पात्राबाहेर गेली असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच ३७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात आणि विशेषतः धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पहिल्याच जोरदार पावसात पंचगंगा नदीने नदीपात्र ओलांडल्याची ही यंदाची पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. राधानगरी धरणाचा साठा सध्या ६४.१३, काळम्मावाडी धरण-३७.४७ टक्क्यांवर पोहोचला आहे. या धरणातून ३१०० क्युसेक दराने पाणी भोगावती नदीत विसर्ग सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राधानगरी मोठा प्रकल्प
दि. २४/0६/२०२५ – दुपारी ४.०० वा.
➡️ पाणी पातळी – ३२९.४० , पाणीसाठा – ५.३६ टीएमसी
➡️ बी.ओ.टी.विसर्ग – १६०० क्युसेक
➡️ सेवा द्वार – १५०० क्युसेक, एकूण विसर्ग =३१०० क्युसेक
प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
राधानगरी तालुक्यामधील पनोरी, लिंगाचीवाडी, काळम्मावाडी रस्त्यांवर दरड कोसळली आहे. प्रशासनाच्या वतीने सतर्कता ठेवत अवघ्या दोन तासांत रस्ता केला मोकळा केल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे.
नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, आपत्कालीन व्यवस्थेसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना नदीपात्राजवळ जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
———————————————————————————————-



