अविनाश पाठक : नागपूर
आजच्या काळात स्मार्टफोन नामक खेळण्यात तासन डोके घालून बसण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सुरुवातीला ही प्रवृत्ती फक्त मोठ्यांमध्येच होती. मात्र आज अगदी अडीच तीन वर्षाच्या मुलाच्या हातात देखील स्मार्टफोन दिसतो, आणि ते लेकरू स्मार्टफोनवर युट्युब वरील रील्स पाहून खदाखदा हसताना दिसते. या मुलाच्या हातून जर कोणी तो स्मार्टफोन काढून घेण्याचा प्रयत्न केला तर ते लेकरू जोरात भोकाड पसरते. मग समोरचा माणूस “भीक नको पण कुत्रा आवर” या न्यायाने पुन्हा त्याच्या हातात तो स्मार्टफोन देऊन टाकतो. हे आज घराघरात दिसणारे आणि न नाकारता येणारे वास्तव ठरले आहे. स्मार्टफोन ही सुरुवात आहे त्या पाठोपात मग टॅब आणि मग लॅपटॉप अशी ही प्रवृत्ती वाढत चालली आहे. त्यात लहान मुलेच नाही तर मोठे आणि वयोवृद्ध देखील सहभागी झालेले दिसतात..
या सर्व प्रकारामुळे होणारे दुष्परिणाम कोणीच विचारात घेत नाही हे समाजाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि नेत्ररोगतज्ञ डॉ. रवी चव्हाण यांच्या निरीक्षणा नुसार मुलांमधील हे वाढते प्रमाण जास्त चिंताजनक असून येत्या काही वर्षात प्रत्येक लहान मुलाच्या डोळ्यावर चष्मा दिसला तर नवल वाटू नये.
खरोखरीच आज एखाद्या प्राथमिक शाळेत एखाद्या वर्गखोलीत तुम्ही डोकावलात, तर अर्ध्या अधिक मुलांच्या डोळ्यावर चष्मा लागलेला दिसेल. मला आठवते आज पासून पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही शाळेत शिकत होतो तेव्हा एखाद्या वर्गात एखाद्याच मुलाच्या डोळ्याला चुकून माकून चष्मा दिसायचा. असा मुलगा किंवा मुलगी तो चष्मा लवकरात लवकर कसा जाईल हाच प्रयत्न करायचा. आज मात्र चित्र वेगळे आहे. घरोघरी मूल दहा-बारा वर्षाचे झाले की डोळे दुखतात म्हणून तक्रार करू लागते. कुणाला मग पुस्तकातले बारीक अक्षर दिसत नाही, किंवा मग फळ्यावरचे नीट वाचता येत नाही. मग आई वडील त्या मुलाला नेत्ररोगतज्ञाकडे घेऊन जातात आणि थोड्या दिवसातच त्या मुलाच्या किंवा मुलीच्या डोळ्यावर चष्मा चढलेला दिसतो.
लहान वयात डोळ्याला चष्मा लागण्यामागे विविध कारणे आहेत. त्यात आजच्या काळात पूर्वीसारखे पौष्टिक अन्नही खायला मिळत नाही. त्याचाही परिणाम कुठेतरी दृष्टीवर होतो हे वास्तव नाकारता येत नाही. पण त्याचबरोबर या सर्व आधुनिक सोयीसुविधांचा अतिरेकी वापर हा देखील अनेकांची दृष्टी बिघडवून त्यांना दृष्टीदोषी बनवण्यास कारणीभूत ठरतो.
आधी नमूद केल्याप्रमाणे आज अगदी अडीच तीन वर्षाच्या मुलाच्या हातात देखील स्मार्टफोन दिसतो. आज कुटुंब संकुचित झाले आहे. पूर्वी घरात मोठी भावंडे असायची, आजी आजोबा असायचे, मोठे काका आत्या देखील असायचे. ते अशा लहान मुलांना सांभाळायचे, खेळवायचे आणि त्यांचे मन गुंतवून ठेवायचे. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. घरात नवरा बायको आणि एकच मुल असते. त्यातही आई आणि बाबा दोघेही नोकरीचे असले तर त्याच्या मागे त्यांचे व्याप असतात. मग अशावेळी मूल रडू लागले तर त्याच्या हातात कधी स्मार्ट फोन दिला जातो, तर कधी टीव्हीवर त्याला कार्टून सिरीयल लावून दिली जाते. आई आणि बाबा दोघेही कामावर गेल्यानंतर जर ते मुल एखाद्या आयाच्या ताब्यात जाणार असेल तर तर मग विचारायलाच नको. या आया निर्धास्थपणे त्या मुलांना टीव्ही लावून देतात किंवा त्यांच्या हातात टॅब देतात आणि स्वतः एकतर फोनवर गप्पा तरी मारतात किंवा झोप तरी घेतात.
या सर्वच प्रकारामुळे या आधुनिक यंत्रामधून जे प्रकाश किरण निघतात, ते लहान मुलांच्या डोळ्यावर पडून लहान वयातच त्यांच्या दृष्टीवर विपरीत परिणाम होत असतो. हा परिणाम सुरुवातीला लक्षात येत नाही. मग त्याचे पर्यावसान लहान वयात चष्मा लागण्यात होते.
डॉ. रवी चव्हाण यांच्या माहितीनुसार असा त्रास फक्त लहान मुलांनाच होतो असे नाही. तर मोठ्यांनाही होतो. कारण आज लहान मोठे सगळेच तासचे तास स्मार्टफोनवर राहतात. अनेकांना दिवसभर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर कामही करावे लागते. त्यामुळे लहान वयातच त्यांना चष्मा तर लागतोच, पण त्याचबरोबर वारंवार चष्म्याचा नंबरही बदलावा लागतो. जर त्याकडे दुर्लक्ष झाले तर मग डोळ्यातून पाणी येणे, डोळे चुरचुरणे असे प्रकार वाढू लागतात. याच प्रकाराला मायोपिया असे म्हटले जाते.
सुरुवातीच्या काळात सर्वसाधारण व्यक्तीच्या डोळ्यात दृष्टीदोष हा व्यक्ती ४० वर्षाची झाल्यानंतरच निर्माण व्हायचा. हा वयापरत्वे येणारा दृष्टीदोष होता. त्यात मग बारीक अक्षर वाचायला त्रास होणे, किंवा प्रसंगी दूरचे दिसायला त्रास होणे, असे प्रकार व्हायचे, आणि मग त्यांना चष्मा लावावा लागत असे. त्यामुळेच जुन्या काळात चष्म्याला चाळीशी असेही म्हटले जायचे. आज मात्र चष्मा ही चाळिशी राहिलेली नाही. अगदी प्राथमिक शाळेत, माध्यमिक वर्गांमध्ये, महाविद्यालयात आणि मग पुढे नोकरीला लागणाऱ्या तरुणांमध्ये देखील चष्म्याचे प्रमाण खूप वाढलेले दिसते. त्याला कारणेही तशीच आहेत. विशेष म्हणजे आजच्या काळात सर्वांनाच कॉम्प्युटरवर कमी अधिक प्रमाणात काम करावे लागते. त्याचबरोबर टीव्ही तर घराघरात माणूस जागृत अवस्थेत असेपर्यंत सातत्याने बघितला जातो. त्यामुळेच हे दृष्टी दोषांचे आणि परिणामी चष्म्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. हे प्रकार असेच चालू राहिले तर अगदी लहान वयात असलेला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी चष्म्यासह दिसेल. वेळीच पावले उचलली नाही तर ही परिस्थिती यायला फारसा वेळ लागणार नाही.
त्यासाठी आजच प्रत्येकाने आवश्यक ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आम्ही टीव्ही बघायचा, पण तो किती काळ हेही ठरवायची वेळ आली आहे. स्मार्टफोनवर टॅब वर आणि लॅपटॉप वर किती काळ काम करायचे याचाही निर्णय घ्यावा लागणार आहे. नेत्र तज्ञांच्या मते सतत तुम्ही काम करत राहिलात तर तुमचा दृष्टीदोष लवकरात लवकर वाढीला लागेल. मात्र हेच काम करत असताना थोड्या थोड्या वेळाने जर स्क्रीनवरील चित्र पहाणे थांबवले आणि दरवेळी एक पाच मिनिटाचा ब्रेक दिला, तर ही परिस्थिती लांबवता निश्चित येऊ शकते. त्यात सोबतच आम्हाला खाण्यापिण्यात देखील आवश्यक ते बदल करावे लागतील. तरच या निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर मात करणे शक्य होईल. अन्यथा डॉ. रवी चव्हाण यांनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार पुढील काही वर्षात प्रत्येक मुलाला अगदी लहान वयातच चष्मा लागलेला दिसेल, हा धोका लक्षात घ्यायलाच हवा.