पंढरपूर : विशेष प्रतिनिधी
यंदाच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. विठ्ठल मंदिर परिसरात थेट जाणारा रस्ता प्रथमच ‘वनवे’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्देशानुसार हा निर्णय लागू करण्यात येत असून, लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
भाविकांना मोकळा श्वास… चेंगराचेंगरीस आळा
आषाढी एकादशीला दरवर्षी लाखो भाविक विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. त्यामुळे मंदिर परिसर आणि शहरातील मुख्य मार्गांवर प्रचंड गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर, गर्दीमध्ये गोंधळ किंवा चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यासाठी मंदिर परिसरातील थेट जाणाऱ्या रस्त्यावर ‘वनवे’ व्यवस्था लागू केली जात आहे. यामुळे भाविकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय मंदिर परिसरात प्रवेश करता येणार आहे.
व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज
वाहतूक मार्गाच्या फेरबदलाबरोबरच संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवली असून, माहिती केंद्रे, हरवलेल्यांसाठी शोध केंद्रे, अन्न-पाणी वितरण व्यवस्था याही ठिकाणी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन सेवा तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि वारकरी मंडळांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांकडून करण्यात आले आहे.
आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. या परंपरेला कोणत्याही अडचणीशिवाय पुढे नेण्यासाठी प्रशासनाने घेतलेला वनवे रस्त्याचा निर्णय स्तुत्य आहे. भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा, स्थानिक नागरिक आणि वारकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न केल्यास यंदाची आषाढी वारी अधिक सुव्यवस्थित आणि स्मरणीय ठरणार आहे.
—————————————————————————————–



