यवत ता. दौंड : विशेष प्रतिनिधी
आषाढी वारी निमित्त महाराष्ट्रभरांतून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या अनुक्रमे देहू आणि आळंदी येथून प्रस्थान करून भक्तिरसात न्हालेल्या वारकऱ्यांच्या ओसंडून वाहणाऱ्या प्रेमाला यवत गावाने पुन्हा एकदा आपली परंपरा जपत आदराची मानवंदना दिली आहे.
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज यवत मुक्कामी पोहोचला असून, येथील श्री काळभैरवनाथ मंदिर प्रांगणात पालखीचा विसावा आहे. यवत गावात गेल्या अनेक वर्षांपासून वारकऱ्यांच्या सेवेसाठी एक आगळीवेगळी परंपरा जपली जाते. या परंपरेनुसार, संपूर्ण गाव एकत्र येत वारकऱ्यांसाठी पिठलं-भाकरीचा महाप्रसाद आयोजित करतो.
यावर्षी देखील या परंपरेनुसार तब्बल एक टनाहून अधिक पिठलं तयार करण्यात येणार असून, एक लाखाच्या घरात भाकऱ्या बनवण्यात येतील, अशी माहिती ह.भ.प. नाना महाराज दोरगे आणि गावकरी चंद्रकांत दोरगे यांनी दिली. या उपक्रमासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी हातात हात घालून तयारी केली आहे. महिलांनी भाकऱ्या थापण्याचा मोठा उपक्रम हाती घेतला आहे, तर तरुण आणि ज्येष्ठ मंडळी पिठलं तयार करण्यात मदत करत आहेत.
सामूहिक सहभाग आणि वारकरी प्रेम
यवत गावातील ही परंपरा केवळ प्रसाद वाटपापुरती मर्यादित नसून, यातून गावकऱ्यांचे वारकऱ्यांप्रती असलेले प्रेम, श्रद्धा आणि सेवाभाव ठळकपणे दिसतो. अनेक वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे आणि त्यात आजतागायत खंड पडलेला नाही. गावातील प्रत्येक घरातून या उपक्रमात सहभाग असतो. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या सेवेत सामील होतात.
या महाप्रसादाची एक विशिष्ट पद्धत आहे. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक रहिवासी आपल्या परीने पाच–दहा भाकरी या महाप्रसादासाठी देतात. तर काही गावकरी हे १०० भाकऱ्या ही देतात. हे सर्व पालखी ज्या ठिकाणी विसाव्याला थांबते त्या मंदिरात आणून दिलं जातं. संपूर्ण गावातून येणाऱ्या भाकऱ्या या ठिकाणी जमा केल्या जातात. त्यानंतर पालखी त्या ठिकाणी आल्यानंतर वारकऱ्यांना त्याचं वाटपही याच ठिकाणी केलं जातं.
भाकऱ्यांनंतर विषय ते येतो तो पिठल्याचा शिवाय अतिरीक्त भाकऱ्यांचा. त्याची जबाबदारी श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळ घेतं. त्यांच्या वतीने मंदिर परिसरात ३०० किलो पिठाच्या भाकरी बनविण्यात येतात. गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरी देखील भाकरी बनवून पालखी येण्यापूर्वी मंदिरात देण्यात येतात. याला अनेक वर्षांची परंपरा आहे. याकामात गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती हे मदतीसाठी येत असतात. यात पुरुषांबरोबर महिलांचाही सहभाग मोठा असतो ग्रामस्थ शितल शेळके यांनी सांगितलं. यातून मिळणार समाधान हे मोठं असतं असंही त्या सांगतात.
वारकऱ्यांची सेवा हीच खरी वारी आहे, हा संदेश यवत गावकरी सातत्याने देत आले आहेत. या प्रसंगी गावामध्ये भक्तिरसाने भारलेले वातावरण असून, पालखीचे स्वागत, आरती, कीर्तन आणि सामुदायिक महाप्रसादाने वारीचा सोहळा अधिकच पवित्र झाला आहे. यवत गावाने दाखवलेला हा आदर्श इतर गावांसाठी देखील प्रेरणादायक ठरत आहे. वारकरी संप्रदायातील सेवा, त्याग आणि भक्तीची ही परंपरा यवत गावाने उत्साहाने पुढे चालवत वारकऱ्यांच्या पंढरीच्या वाटचालीला आपल्या योगदानाने अधिक पवित्र केले आहे.
———————————————————————————




