कुरुंदवाड : अनिल जासुद
धरणपाणलोट क्षेत्रात पावसाने काही अंशी उघडीप दिल्याने शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत रविवार सकाळपासून घट होत आहे. यामुळे नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात या मोसमातला होऊ घातलेला पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता कमी आहे.
दक्षिणद्वार सोहळ्यासाठी अजून किमान तीन फुट पाणी वाढणे आवश्यक होते. मात्र आता पाणी ओसरु लागले आहे.
शुक्रवारी कृष्णा नदीचे पाणी मंदिराजवळ पोहचले. शनिवारी सकाळी ते मंदिराच्या मंडपात शिरले. यानतंर शनिवारी दिवसभरात कृष्णेच्या पाणी पातळीत फक्त दीडफुटाने वाढ झाली. यामुळे रात्री नऊ वाजता ते मंदिर गाभार्यापर्यंत पोहचले..
दक्षिणद्वार सोहळ्यासाठी अजून तीन फुट पाणी वाढणे आवश्यक होते मात्र ,
शनिवारी रात्रीतून फक्त ३ इंचाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे रात्री दक्षिणद्वार सोहळा होऊ शकला नाही.
दरम्यान धरणपाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने कृष्णेच्या पाणीपातळीत रविवार सकाळपासून घट होत आहे.
पुराचे पाणी ओसरु लागल्याने दक्षिणद्वार सोहळ्यासाठी किमान अडीच ते तीन फुट पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता कमी असल्यामुळे सध्या तरी या मोसमातला पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता कमीच आहे.
गेले दोन दिवस दक्षिणद्वार सोहळ्यासाठी व दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकमधून आलेले भाविक मंदिरासमोर असलेल्या गुडघ्याएवढ्या पाण्यातूनच “श्री” चे दर्शन घेत आहेत.






