कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
योग हे भारतात हजारो वर्षांपासून चालत आलेले एक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शास्त्र आहे. योगासने ही त्यातील एक महत्त्वाची शाखा आहे. योगासनाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. भारतात इ.स. पू. ३ ते २ हजार वर्षापूर्वी मोहनजोदडो – हडप्पा संस्कृती होती. मोहनजोदडो आणि हडप्पा या पुरातन शहरांत काही मुद्रा सापडल्या आहेत, ज्यामध्ये ध्यानमुद्रेत बसलेले पुतळे/चित्रे आढळली आहेत. यावरून असे मानले जाते की योगाची काही प्राथमिक रूपे त्या काळात अस्तित्वात होती. योगासनाचा इतिहास हा केवळ शारीरिक व्यायामाचा इतिहास नसून, तो आत्मज्ञान, मानसिक शांती आणि शारीरिक आरोग्य यांचा संगम आहे. योग आज आधुनिक विज्ञानानेही मान्य केलेली जीवनशैली आहे.
वेदकालीन योग (इ.स.पू. १५००-५००) : ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यामध्ये योगाची बीजे आढळतात. यज्ञ, ध्यान, तपश्चर्या इ. क्रियांसह मानसिक नियंत्रणाची तत्त्वे आढळतात.
उपनिषदकाल आणि ध्यानयोग (इ.स.पू. ८००-३००) : उपनिषदांत ध्यान, प्राणायाम, एकाग्रता, आत्मसाक्षात्कार यांचे सुंदर विवेचन आहे.’श्वेताश्वतर उपनिषद’ मध्ये प्रथमतः योगासंदर्भातील सुस्पष्ट चर्चा आढळते. शरीर, मन, आत्मा यांचे तंत्रशुद्ध समायोजन म्हणजे योग असे सांगितले गेले आहे.
योग सूत्र आणि पतंजली (इ.स.पू. २००) : योगशास्त्राला शास्त्रीय रूप देणारे पतंजली ऋषी हे पहिले तत्त्वज्ञ मानले जातात. त्यांनी “योगसूत्र” हा ग्रंथ लिहिला (सुमारे १९५ सूत्रे). या ग्रंथात अष्टांग योगाची (८ पायऱ्यांची) संकल्पना मांडली आहे – यम (नीती), नियम (शिस्त), आसन (शरीर), प्राणायाम (श्वास), प्रत्याहार (इंद्रियसंयम), धारणा (एकाग्रता), ध्यान (मेडिटेशन), समाधी (ध्यानात एकरूप होणे).
मध्ययुगीन काल (इ. स. ५०० – १५००) : हटयोग – या काळात योग साधनेत शरीरसाधना आणि प्राणायाम यावर भर देण्यात आला. हटयोगात आसनांचे संख्यात्मक आणि गुणात्मक वर्णन केले आहे. या काळात अनेक योगासने अस्तित्वात आली. मुख्य ग्रंथ – हठयोग प्रदीपिका – स्वात्माराम योगी, गोरक्षशतक – गोरखनाथ, घेरंड संहिता – घेरंड ऋषी.
आधुनिक काळ (१८व्या शतकानंतर)
स्वामी विवेकानंद (१९व्या शतक) : त्यांनी योग, ध्यान आणि वेदांत यांचे पाश्चिमात्य जगात प्रभावी प्रचार केले.
तिरुमलाई कृष्णमाचार्य (१८८८–१९८९) : आधुनिक योगशास्त्राचे जनक मानले जातात. त्यांनी अनेक योगगुरूंना तयार केले: श्री. बी.के.एस. अय्यंगार, श्री. पट्टाभी जॉयस, इत्यादी.
बी.के.एस. अय्यंगार आणि इतर आधुनिक गुरू : अय्यंगार योग, अष्टांग योग, विनियोग, आणि अनेक प्रकारचे योगशैली याच काळात विकसित झाल्या. बी.के.एस.अय्यंगार यांचे पुस्तक ‘Light on Yoga’
संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून २०१५ पासून जाहीर केला. भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले. आज योग ही एक जागतिक आरोग्य चळवळ बनली आहे.
———————————————————————————————-






