कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात ९ तर सांगली जिल्ह्यात ११ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता १०२ मेगावॅट झाली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत अवघ्या एका वर्षात दोन्ही जिल्ह्यातील ३४,१६१ शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे.
कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. पीएम कुसुम ही योजना शेतीतील ऊर्जा स्वावलंबनासाठी एक महत्त्वाची पाऊल आहे – ज्यामध्ये शेतकरी कमी खर्चात सौर पंप/ऊर्जा यंत्रणा बसवू शकतात, त्यातून पर्यावरण पूरक सिंचन, आर्थिक लाभ आणि अधिक उत्पन्न मिळवू शकतील. राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या शृंखलेतील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील हे २० प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील २९ कृषी वाहिन्यांवरील (फिडरवरील) तर सांगली जिल्ह्यातील ३९ कृषी वाहिन्यांवरील (फिडरवरील) शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ९ प्रकल्प कार्यान्वित; १३,१३५ शेतकऱ्यांना लाभ
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ५४ ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांची एकूण क्षमता १७० मेगावॅट आहे. यापैकी नऊ प्रकल्प कार्यान्वित झाले असून यांची एकत्रित क्षमता ३२ मेगावॅट आहे. यामध्ये हरोली (३ मेगावॅट – १२३६ शेतकरी), आळते (४ मेगावॅट – १९२८ शेतकरी), सातवे (४ मेगावॅट – १२७० शेतकरी), किणी (२ मेगावॅट – १२१७ शेतकरी), हरळी बुद्रुक (३ मेगावॅट – १५५० शेतकरी), नरंदे-तासगाव (७ मेगावॅट – ३३२७ शेतकरी), कोळगाव (२ मेगावॅट – १०२६ शेतकरी), दुंडगे (७ मेगावॅट – १५८१ शेतकरी) या प्रकल्पांचा समावेश होतो. या प्रकल्पामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील १३,१३५ शेतकऱ्यांना शेतीकरता दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.
सांगली जिल्ह्यात ११ प्रकल्प कार्यान्वित; २१,०२६ शेतकऱ्यांना लाभ
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत सांगली जिल्ह्यात ३४ ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांची एकूण क्षमता २०७ मेगावॅट आहे. यापैकी ११ प्रकल्प कार्यान्वित झाले असून यांची एकत्रित क्षमता ७० मेगावॅट आहे. यामध्ये बसरगी (४ मेगावॅट – ११०२ शेतकरी), मणेराजुरी (९ मेगावॅट – २७७५ शेतकरी), माडगुळे (५ मेगावॅट – १४७५ शेतकरी), जिरग्याळ (४ मेगावॅट – १८७६ शेतकरी), लिंगीवरे-पळसखेड (१० मेगावॅट – १९३९ शेतकरी), मोरबगी (१० मेगावॅट – २००९ शेतकरी), उमदी-हळ्ळी (८ मेगावॅट – २४९७ शेतकरी), माडग्याळ (५ मेगावॅट – २३०४ शेतकरी), तिकोंडी (१० मेगावॅट – २१९९ शेतकरी), कोसारी (५ मेगावॅट – २८५० शेतकरी) या प्रकल्पांचा समावेश होतो. या प्रकल्पांमुळे सांगली जिल्ह्यातील २१,०२६ शेतकऱ्यांना शेतीकरता दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.
सौर प्रकल्प उभारणीत जिल्हा प्रशासनाचे सहकार्य
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत दोन्ही जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी व त्यांच्या सर्व प्रशासकीय टीमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. जिल्ह्यातील गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भूमी अभिलेख कार्यालय व जिल्हा परिषद यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे. अशा सौर प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून एकरकमी पाच लाख अनुदान देण्यात येत आहे.
सौर प्रकल्प ग्राहक हिताचे – स्वप्नील काटकर, मुख्य अभियंता, महावितरण
वीज ग्राहक व शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प हे फायद्याचे असून यामुळे शेतीकरता दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारी देखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागणार आहेत. दोन्ही जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा. तसेच उपलब्ध असलेल्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



