कृष्णात चाैगले : कोल्हापूर
शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन आज (१९ जून) दोन्ही गटांकडून साजरा होत आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांनी आपापल्या शक्तिप्रदर्शनासाठी जय्यत तयारी केली असून, हा वर्धापन दिन निव्वळ उत्सव न राहता राजकीय ताकद आजमावण्याचे व्यासपीठ ठरत आहे.
ठाकरे गटाने आपला वर्धापन दिन षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा करताना जोरदार बॅनरबाजी केली आहे. “मुंबईत ठाकरेच” या घोषणेने ठाकरे गटाने पुन्हा एकदा मुंबईवरचा दावा अधोरेखित केला आहे. बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो झळकत आहेत. यामध्ये ठाकरेंच्या वारशाचा दावा स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. ही केवळ एक जाहीरातबाजी नसून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या ब्रँडिंगसाठीचा प्रयत्न मानला जातो.
दुसरीकडे शिंदे गटाने वरळीतील एनएससीआय डोममध्ये आपला वर्धापन दिन आयोजित केला आहे. सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचा “वाघासोबत चालणारा” फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. यामध्ये ‘हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी’ असा संदेश देत शिंदे गटाने आपली ओळख पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे. हा फोटो शिंदेंचा ‘योद्धा’ म्हणून दर्शवतो आणि त्यांचा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरील दावा अधोरेखित करतो.
राजकीय संकेत आणि आगामी लढती
या दोन्ही कार्यक्रमातून दोन वेगवेगळ्या धारणांची आणि नेतृत्वशैलींची झलक पाहायला मिळते. उद्धव ठाकरे यांची सभ्यता आणि वारशावर आधारित सादरीकरण, तर शिंदे गटाची आक्रमक प्रतिमा आणि जनसंपर्काचा झणझणीत वापर दोघेही आपापल्या पक्षाच्या वाढी साठी सज्ज आहेत.
महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकांमध्ये हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे राहतील. त्यामुळे आजच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यांमधून मतदारांमध्ये संदेश देण्याची संधी म्हणून त्यांचा वापर होत आहे.
आजचा दिवस हा केवळ शिवसेनेच्या स्थापनेचा स्मरण दिवस नसून, पक्षातील दोन गटांची अस्मिता, वारसा आणि जनाधार यांची परीक्षा आहे. ठाकरे आणि शिंदे दोघेही बाळासाहेबांच्या वारशाचे खरे वारसदार असल्याचा दावा करत असून, जनतेची साथ कोणाला मिळते हे येणारा काळच ठरवेल. पण आजचा दिवस निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणात एका महत्त्वाच्या टप्प्याचं प्रतीक ठरत आहे.