कृष्णात चौगले : कोल्हापूर
मान्सून पावसाच्या आगमनाने निसर्गसौंदर्य बहरू लागले आहे. पर्यटनस्थळे तरुणाईला खुणावू लागली आहेत. या आल्हाददायक वातावरणात पावसाळी पर्यटनाला बहर येणार आहे. फेसाळणारे धबधबे, हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा हा निसर्गसौंदर्याचा नजारा पर्यटनीय मनाला भुरळ पाडणारा असतो. अगदी या सिझनची वाटच पाहिली जाते. डोंगर रांगांवर पसरलेली धुक्याची दुलई, पावसाची रिमझिम, त्यात भिजण्याचा आनंद मनाला सुखावणाराच असतो. पावसाळी पर्यटन करायला प्रत्येकाला आवडते. मात्र, काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.
पावसात भिजण्यासाठी तर तरुणाई आणखीन बेपर्वा होते. सध्या निसर्ग पर्यटनाला हुल्लडबाजीची किनार लागत आहे. धबधब्यासारखे बेधुंदपणे वाहणाऱ्या या तरुणाईला रोखणे म्हणजे एक आव्हानचं होऊ पाहतंय. पावसाळ्यात भिजणं, भटकणं, हिट, हॉट आणि स्मार्ट असं काहीबाही करायचं, एखाद्या धबधब्याला अगदी चिकटून सेल्फीचे धाडस करण्याची बेपर्वाई करायची आणि थ्रीलिंग अनुभवायचं हे आणि असं काहीसे नियोजन आता सुरू असणार.

वॉटरफॉलच्या पुढे उभे राहून विविध पोजमधील सेल्फी काढून व्हॉटस्अप, स्टेटसला टाकायचे आणि जमलं तर ट्रेकिंग नाही जमले वर धागडधिंगा करून मौज मजा लुटायची, हाच फॅशन ट्रेंड बनत चाललाय, सेल्फीचं तर एवढं गारुड या तरुणाईवर आहे की विचारू नका, धबधबे तरुणाईचे आकर्षण केंद्र बनत असून तेथील सेल्फी म्हणजे मित्रांच्या ग्रुपमधील स्टेटस झाले आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा
- बाहेर पडण्यापूर्वी प्रवासाचे नियोजन व आराखडा गरजेचा आहे.
- घराबाहेर जाताना छत्री, रेनकोट बरोबर असावेत.
- रबराचे शूज वापरावेत.
- कपड्यांचा एक जादा जोड असावा.
- खायला स्नॅक तसेच धर्मास मध्ये चहा, कॉफी किंवा गरम पाणी बरोबर ठेवावेत.
- आवड असेल तर स्पीकर घ्यायला हरकत नाही
- ज्या भागात आपल्याला जायचे आहे त्या भागाची पूर्णपणे माहिती असणे गरजेचे आहे.
- ज्या ठिकाणी जो परिसर आपल्याला माहिती नाही त्या ठिकाणी जाऊ नये.
- पावसाळ्यात बाहेरचे खाणे टाळावे.
- त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे फेस वॉश किवा टोनर वॉश घ्यावा.
या सर्व आल्हाददायक अनुभवांचा मनमुराद आनंद घेताना सुरक्षिततेचा विसर पडू नये, याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीय व्हावा यासाठी पर्यटकांनी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या पावसाळी पर्यटनात निसर्गाशी सख्य जपत, त्याचा सन्मान राखत आपणही त्यात सामील होऊया . कारण निसर्ग जपला, तरच तो आपल्या सौंदर्याने आपले आयुष्यही समृद्ध करील.
————————————————————————————-