पन्हाळा : प्रतिनिधी
जोतिबा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ३५ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पावसाळ्याच्या अनुषंगाने पावसाळी कीट वाटप करण्यात आले. जोतिबा डोंगरावर पावसाचे प्रमाण जास्त असते याची दखल घेऊन जोतिबा ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबवला आहे.
जोतिबा डोंगर हे महाराष्ट्रातील एक मोठे तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते यामुळे ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांना संपूर्ण परिसरात स्वच्छता कार्य करावं लागते. त्याचबरोबर पाणीपुरवठा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा पावसात काम करावे लागते. कर्मचाऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन जोतिबा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ३५ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पावसाळी कीट वाटप करण्यात आले. या कीट मध्ये पुरुष कर्मचाऱ्यांना ड्रेसकोडचे प्रत्येकी दोन नग, महिला कर्मचाऱ्यांना ड्रेसकोडचे तीन नग, रेनकोट, छत्री, पावसाळी बूट आणि बॅटरी असे साहित्य आहे. जोतिबा ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाबद्दल कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
या कीट वितरण कार्यक्रमावेळी ग्रामपंचायतचे प्रशासक श्री. अभिजित भानुदास गावडे व ग्रामपंचायत अधिकारी श्री. विठ्ठल भावकू भोगण, धनाजी शिंगे आणि कर्मचारी उपस्थित होते.