कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
यंदा पंढरपूरमध्ये ६ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारीच्या मुख्य सोहळ्यासाठी राज्य शासनाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी आर्थिक, आरोग्य आणि सुरक्षा अशा तिन्ही आघाड्यांवर भक्कम तयारी केली आहे. लाखो वारकरी, विविध दिंड्या, मानाच्या पालख्या यांना सुरक्षित व सुकर वारीचा अनुभव देण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारने मानाच्या दहा पालख्यांसोबत सहभागी होणाऱ्या ११०९ दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान मंजूर केले आहे. यासाठी एकूण दोन कोटी २१ लाख ८० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हे अनुदान वितरित करण्यात येणार असून विभागीय आयुक्तांकडून प्राप्त दिंड्यांची यादी अंतिम करण्यात आली आहे.
‘चरणसेवा’ उपक्रमातून आरोग्य सेवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार यंदा ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षा’ तर्फे ‘चरणसेवा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे.
या उपक्रमासाठी जवळपास पाच हजार वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल स्टाफ, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक कार्यरत आहेत. दिंडी मार्गावरील ४३ ठिकाणी मुक्कामांची व्यवस्था करण्यात आली असून, तेथे सुसज्ज वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारली आहेत. स्थानिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालये या उपक्रमात सहभागी आहेत.
पोलीस यंत्रणेची कडक सुरक्षा व्यवस्था
वारीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्य पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. वारीच्या मुख्य सोहळ्यासाठी राज्य पोलीस दलातील तब्बल सहा हजार पोलीस कर्मचारी आणि ३,२०० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्याही सतर्कतेसाठी तैनात आहेत.
संपूर्ण पालखी मार्गावर ड्रोनच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाणार आहे. गर्दीच्या नियंत्रणासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क आहेत.
राज्य शासनाच्या या त्रिसूत्री नियोजनामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आर्थिक मदत, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे यंदाची वारी अधिक सुयोग्य आणि सुरक्षित होणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
——————————————————————————————