कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आज कर्नाटकी बेंदूर. हा नुसता एक सण नाही, तर शेतकऱ्याच्या आणि बैलजोडीच्या नात्याचा आपुलकीचा दिवस आहे. पावसाळ्यात शेतीची कामं जोमात सुरू असताना, या कामात जीव ओतणाऱ्या बैलांना थोडा आराम मिळावा म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नातं दाखवणारा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
बळीराजा सोबत त्याला सतत साथ देणाऱ्या बैलांची पूजा करणे ही आपली संस्कृती आहे. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्याप्रति संवेदना प्रगट करण्याचा, त्यांचे कौतुक करण्याचा सण म्हणजे ‘बेंदूर. शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपल्या जिव्हाळ्याशी संबंधित आहेत. आपली कृषी संस्कृती जपणारा आणि ग्रामीण जीवनात चैतन्य पसरवणारा बेंदूर सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बैलजोडीच्या पूजनाने जे समाधान शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर फुलले आहे, ते कायम टिकून राहण्यासाठी त्यांच्या कष्टाला न्याय मिळायला हवा.
शेती, शेतात राबणारा शेतकरी आणि त्याच्याबरोबर रात्रंदिवस कष्ट करणारी बैलजोडी हे चित्र अजूनही ग्रामीण भागांत डोळ्यासमोरून जात नाही. या बैलजोडीचा शेतकऱ्याच्या जीवनात असलेला मान, प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ‘बेंदूर’ सण साजरा केला जातो. बैलजोडी शेतीची नांगरणी असो, पेरणी असो की राबराब राबणारी मशागत असो. प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याला साथ देत असते. माणसाच्या भाकरी मागे हा मुक्या जीवाचा मोठा वाटा असतो. यासाठीच एक दिवस त्यांना विश्रांती देऊन, अंघोळ घालून, सुगंधी तेल लावून, रंगीबेरंगी हार, फुलं, हळद-कुंकू लावून पूजन केलं जातं.
बेंदूर सणाला पुरातन इतिहास आहे. ऋषीमुनींनी सृष्टीचक्राच्या समतोलासाठी प्राणी, पशू, पक्षी, निसर्ग यांच्याशी स्नेह जपण्याची शिकवण दिली. त्यातूनच बैल हा माणसाचा सर्वात जुना सहकारी आहे. ‘नंदी’ च्या रुपात बैलाचे देवत्व ही मानले गेले.
आज यंत्रयुग आलं असलं तरी अजूनही डोंगर कपारीतील शेतीत बैलजोडीचा आधार आहेच. कमी जागेतील शेतजमीन, पाण्याचा अभाव व उंचसखल भागात ट्रॅक्टरची जागा अजूनही बैल घेतोय. म्हणूनच शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी शेतकऱ्याला आपली शेती, बैल, निसर्ग यांच्याशी आपुलकीने संवाद साधायचा असतो. हाच संवाद पुढच्या हंगामातील चांगल्या उत्पादनासाठी आश्वासक ठरतो.
या निमित्तानेच बेंदूर सण शतकानुशतकं शेतकऱ्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलाय. बेंदूर म्हणजे फक्त सण नाही. तर तो शेतकऱ्याच्या कष्टाच्या साथीदाराला दिलेला प्रेमाचा मुजरा आहे..
—————————————————————————————-



