शाहुवाडी प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
शाहुवाडी तालुक्यातून गेलेल्या कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या दोन्ही बाजूंचे नाले मुजले असून पावसाळ्यात पाणी रस्त्यावरच साठून राहत असल्याने रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्यांची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
शाहूवाडी तालुक्यातुन गेलेल्या कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेले नाले गेले अनेक दिवसांपासून मुजले आहेत तर काही ठिकाणी नाले गायब झाले आहेत. पावसाळ्यात पावसाचे पाणी अनेक ठिकाणी रस्त्यावरूनच वाहत असल्यामुळे रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरून दिवसभरात सुमारे हजारो वाहनांची वर्दळ होत असते.
वाहन धारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागतं आहे. पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्याला वाट मिळत नाही यामुळे या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून त्यातील बारीक दगड रस्त्यावर पसरले आहेत. आशा निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता आहे.
सध्या याच मार्गावर रत्नागिरी – नागपूर महामार्गाचे काम सुरु असल्याने रस्त्यावर चिखल आणि बारीक माती मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे देखील अपघात होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे भरून रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेलें नाले स्वच्छ करून रस्त्यावर पसरलेली माती आणि चिखल काढावा, अशी मागणी नागरीकांतून होत आहे.



