कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा राजर्षी शाहू पुरस्कार चित्रपट आणि नाट्य क्षेत्रांत दिग्दर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही घोषणा केली.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मार्फत राजर्षी शाहूंना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी विविध व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. राजर्षी शाहू महाराजांच्या १५१ व्या जयंती दिनी समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान करणाऱ्या व्यक्तीस १९८४ पासून राजर्षी शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे. यावेळी डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. चौसाळकर, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उप पोलीस अधीक्षक सुवर्णा पत्की उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांचा जन्म २३ जून १९४२ रोजी पंढरपूर ( सोलापूर ) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकरण हायस्कूल मध्ये झाले व इथेच त्यांना नाटकात काम करण्याची आणि दिग्दर्शनाची संधी मिळाली. त्यांनी सन १९६८ साली पुण्याच्या बी. जे. मेडीकल कॉलेजमधून एम. बी. बी. एस. पदवी मिळवली व त्यानंतर १९७० साली मुंबईहून चाईल्ड हेल्थ पदविका (DCH) प्राप्त केली. सन १९७१ मध्ये त्यांनी दौंड जि. पुणे येथे आपल्या स्त्रीरोगतज्ञ पत्नीबरोबर वैद्यकीय व्यवसाय सुरु केला.
डॉ. जब्बार पटेल – कॉलेज जीवनापासूनच रंगभूमीशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. ‘थिएटर अॅकेडमी’ नावाची प्रायोगिक नाटकांसाठीची नाट्यसंस्था स्थापन केली व या संस्थेने मराठी रंगभूमीच्या इतिहासात महत्वाची कामगिरी बजावली. सन १९७० मध्ये त्यांनी विजय तेंडूलकर लिखित ‘अशी पाखरे येती’ या नाटकाचे दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. सन १९७२ मध्ये त्यांनी ‘घाशीराम कोतवाल’ हे ऐतिहासिक व राजकीय परिप्रेक्षातील क्रांतीकारी नाटक सादर केले, ज्याला जागतिक स्तरावर प्रचंड प्रसिध्दी आणि मान्यता मिळाली. या नाटकाचे प्रयोग इंग्लड, अमेरिका, कॅनडा, रशिया, जर्मनी, हंगेरीसह युरोपातील अनेक देशांमध्ये यशस्वी झाले.
१९७५ मध्ये चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी ‘सामना’ या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले. हा चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी अधिकृत निवड यादीमध्ये अंतर्भूत होता. त्यानंतर सन १९७८ मध्ये ‘तीन पैशाचा तमाशा’ हे पु. ल. देशपांडे यांचे नाटकही त्यांनी प्रभावीपणे रंगमंचावर आणले. त्याच सुमाराला १९७८ मध्ये ‘जैत रे जैत’ हा मंगेशकर कुटुंबियांनी निर्मिती केलेला लोकसंगीतप्रधान चित्रपट दिग्दर्शित केला, १९७९ साली दिग्दर्शित केलेला ‘सिंहासन’ हा राजकीय परिस्थितिवरील उपरोध असलेला चित्रपट खुप गाजला. पुढे त्यांनी स्वतः निर्माती व दिग्दर्शित केलेला ‘उंबरठा’ या चित्रपटाने त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली ज्यामध्ये स्मिता पाटील आणि गिरीष कर्नाड यांच्या मुख्य भूमिका होत्या. ‘एक होता विदुषक’ सन १९९१ मधील संगीतमय विनोदी चित्रपट आणि १९९४ मधील ‘मुक्ता’ या राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.
डॉ. जब्बार पटेल यांचा संगीत नाटक अकादमी कडून सन १९७८ साली सन्मान झाला. त्यांना भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार सन १९८२ मध्ये मिळाला, पुण्यभूषण पुरस्कार २००२ मध्ये, विष्णुदास भावे पुरस्कार २०१४ मध्ये मिळाला. सध्या ते महात्मा जोतिबा फुले यांच्यावर चित्रपट बनवत आहेत.
——————————————————————————————-