मुंबई : विशेष प्रतिनिधी
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती देण्याची घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी २२ एप्रिल रोजी केली. परंतु, राज्यातील शाळा सुरू होण्यास अवघे आठ दिवस उरले असताना अद्याप सुधारीत शासन निर्णय काढलेला नाही. उलट अनिवार्य शब्द बदलण्याबाबत शासन स्तरावर विचारमंथन सुरू आहे. विद्यार्थ्यांचे पालक, तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. मात्र, हिंदी भाषेला स्थगिती द्यायची की भाषा अनिवार्य ठेवायची की ऐच्छिक करायची याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. मुख्यमंत्र्यांकडून आतापर्यंत सिग्नल मिळत नसल्याने आणि शाळा सुरू होण्यास आठ दिवस उरल्याने शिक्षण विभागाची धावपळ सुरू आहे.
राज्य सरकारने नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा बंधनकारक केली. सर्वच स्तरातून यावर टीकेची झोड उठल्यानंतर स्थगिती द्यावी लागली. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हिंदी सक्तीच्या निर्णयाला स्थगिती देत सुधारीत परिपत्रक काढू असे जाहीर केले. आज ४७ दिवस उलटून गेले तरी सुधारित शासन निर्णय काढलेला नाही. येत्या १५ जून पासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा पालकवर्गाकडून केली जात आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शकवण्याचा निर्णय मागे घ्या. मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा शिकवण्याचे परिपत्रक काढा. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभे करू, सरकार त्याला जबाबदार राहील असा इशारा दिला. सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे.
हिंदी भाषा संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे बैठक होणार आहे. त्यानंतर हिंदी अनिवार्य करायचा की ऐच्छिक याबाबत निर्णय होईल. परंतु, मुख्यमंत्र्यांकडून बैठक लावण्यासंदर्भात अद्याप कोणतेही संदेश मिळाले नाहीत. जोपर्यंत निर्णय होणार नाही, तोपर्यंत अधिकृतपणे अनिवार्य की ऐच्छिक संदर्भातील निर्णय घेता येणार नाही, असे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील शाळा १६ जूनपासून सुरू होणार
मुंबईसह पुणे, नाशिक, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागातील शाळा सोमवार, १६ जूनपासून सुरु होणार आहेत. शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे यांनी याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. राज्यात १ लाख आसपास शाळा असून, २ कोटी ८ लाख विद्यार्थी संख्या आहे. महाराष्ट्रातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांसाठी २ मे २०२५ पासून उन्हाळी सुट्टी लागू केली होती. नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची सुरुवात विभागनिहाय वेगवेगळी होणार आहे. शाळा प्रशासनांनी या सूचना आपल्या अधीनस्थ शाळांना त्वरीत कळवाव्यात, असे आवाहन शिक्षण संचालकांनी केले आहे.
विदर्भात शाळेची घंटा आठ दिवसा आधी –
पावसाच्या लवकर आगमनामुळे विदर्भ विभागातील शाळा यंदा ८ दिवस आधी म्हणजेच सोमवार, २३ जूनपासून सुरु होणार आहेत. या आठवड्यातील शालेय वेळ सकाळी ७ ते ११.४५ पर्यंत असेल. सोमवार ३० जूनपासून शाळा नियमित वेळेनुसार भरतील. दरवर्षी उष्णतेमुळे विदर्भातील शाळा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरु होतात. मात्र यंदा हवामानातील बदलामुळे आणि पावसाच्या सुरुवातीमुळे हा निर्णय घेतला आहे.
——————————————————————————————–



