कोल्हापूर डेस्क : प्रसारमाध्यम न्यूज
“बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली कष्टाने कार्यकर्ते आणि नेत्यांमुळे तो पक्ष बांधला. दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली. परंतु, आज आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील, तर ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पण यामुळे राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांबद्दल असलेल्या भूमिकेचा फटका कॉंग्रेसला बसण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाविकास आघाडी वगळून एकत्र येणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का? राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येणार का? अशी चर्चा जोर धरत आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे महाष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील तर मी अर्थातच त्याचे स्वागत करीन. एकत्र येणे हा एका सशक्त लोकशाहीमध्ये तो प्रत्येक संघटनेला अधिकार आहे”, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी फार कष्ट करून शिवसेनेची स्थापना केली आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. पण उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवण्यासाठी चाचपणी सुरु केल्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मनसेची उत्तर भारतीयांबद्दल असणाऱ्या भूमिकेविषयी चर्चा झाल्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर महिन्यात बिहार विधानसभा निवडणूक होईल त्याचवेळी मुंबई महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक होईल. त्यामुळे मनसेच्या उत्तर भारतीयांबद्दल असणाऱ्या भूमिकेचा कॉंग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे राज ठाकरे आणि महाविकास आघाडी यांचे मनोमिलन होणार का, की फक्त उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करतील ते पाहावं लागेल.



