कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी आज उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमुळे देशमुख शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता अधिक बळावली आहे.
या भेटी दरम्यान देशमुखांसोबत राज्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत आगामी राजकीय रणनीतीबाबत सविस्तर चर्चा झाली असून, देशमुख लवकरच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, याच बैठकीला माजी महापाैर निलोफर आजगेकर यांचे पती अश्कीन आजगेकर व सामाजिक कार्यकर्ते अभिजीत खतकर हे देखील उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या देखील शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चांना जोर चढला आहे. स्थानिक पातळीवर खतकर यांची समाजसेवा आणि तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता पाहता, त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
राजकारणात या हालचाली येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. दोघांचे प्रवेश निश्चित झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात.
——————————————————————————————