बहिरेश्वर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यात रासायनिक खते व किटकनाशकांचा अतिवापर तसेच पाण्याचा अपव्यय यामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला असून शेती उत्पादनात घट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यावर उपाय म्हणून करवीर तालुक्यात पन्नास हेक्टरचे वीस गट तयार करून एकूण एक हजार हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे कार्य ‘आत्मा’ विभागामार्फत राबवले जात आहे.
करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात दोनशे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनचे तज्ज्ञ तानाजी निकम (श्री सिद्धगिरी कणेरी मठ) यांनी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे उपाय, जैविक निविष्ठांची शेतातच निर्मिती याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे यांनी सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचे सांगितले. “भविष्यातील पिढ्यांसाठी आरोग्यदायी व सुपीक जमीन शिल्लक ठेवायची असेल, तर नैसर्गिक शेतीचा स्वीकार अपरिहार्य आहे,” असे त्या म्हणाल्या.
लाभार्थी शेतकरी गटांना निविष्ठा निर्मितीसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. तसेच, आदित्य मांगले यांनी शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन केले. तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती दिली. तसेच खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
या वेळी माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, बहिरेश्वरच्या सरपंच वंदना दिंडे, शिरोली दु.चे सरपंच सचिन पाटील, शाहू सेंद्रिय शेतकरी गटाचे अध्यक्ष ज्ञानदेव बचाटे, सचिव रामचंद्र वरुटे, निवृत्ती दिंडे, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सुंदरम माने व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निखिल कुलकर्णी यांनी नियोजन केले. बहिरेश्वर, गणेशवाडी, आमशी, तेरसवाडी तर्फे कदमवाडी येथील नैसर्गिक शेती गटांचे सदस्य प्रशिक्षणास उपस्थित होते.
————————————————————————————