सौरऊर्जेची क्रांती : ‘प्रधानमंत्री सूर्य घर योजना’ ला देशभरातून प्रतिसाद

0
284
Google search engine

नवी दिल्ली : प्रसारमाध्यम न्यूज

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्य घर योजने ला देशभरातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या योजने अंतर्गत देशातील दहा कोटी घरांच्या छतांवर सौर पॅनल्स बसवण्याचे मोठे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे. यामुळे नागरिकांचे वीजबिले मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, पर्यावरणपूरक ऊर्जा वापरालाही प्रोत्साहन मिळणार आहे.

या योजनेमुळे प्रत्येक घर आपल्या वापरासाठी आवश्यक वीज स्वतः निर्माण करू शकणार आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरजू कुटुंबांसाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरत आहे. सरकारकडून अनुदान आणि तांत्रिक मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जात आहे, त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने अर्ज करायला सुरुवात केली आहे.

ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी सांगितले की, “ही योजना भारताच्या ऊर्जा स्वावलंबनासाठी टप्पा ठरणार असून, देशाला हरित ऊर्जा दिशेने नेणारे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

योजनेअंतर्गत :

  • सोलर रूफटॉप बसवण्यासाठी सरकारकडून थेट आर्थिक मदत (सबसिडी) दिली जाईल.

  • सोलर यंत्रणा लावण्यासाठी ऑनलाईन नोंदणी व मंजुरी प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे.

  • यामुळे एकीकडे घरगुती खर्चात बचत, तर दुसरीकडे ऊर्जा क्षेत्रात क्रांतिकारी बदल होणार आहे.

वीजबिलात कपात आणि पर्यावरणाचा बचाव –

सोलर पॅनलमुळे फक्त आर्थिक बचतच नव्हे तर पर्यावरणीय फायदाही दिसून येतो. योजना लागू झाल्यापासून २.५ गीगावॅट उत्पादन क्षमतेची भर पडली असून दरवर्षी १.८ मिलियन टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट झाली आहे.

सबसिडी आणि कर्ज –
 
सरकार १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सोलर सिस्टमसाठी ₹३०,००० ते ₹७८,००० पर्यंत सबसिडी देते. शिवाय कमी व्याजदरात कर्ज व सुलभ हप्त्यांमध्ये परतफेड योजना उपलब्ध आहेत. सोलर इंडस्ट्रीमुळे १० लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या असून, आगामी काळात २० लाख रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.
 
अर्ज कसा करावा ?

 पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी योजनेच्या अधिकृत pmsuryaghar.gov.in वेबसाईट ला भेट द्या. अर्ज केल्यानंतर तुम्ही अर्जाचे स्टेटस देखील ट्रॅक करू शकता. शहरी व ग्रामीण भागांतील सर्व लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी यासाठी सरकारने विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

गुणवत्ता, स्टोरेज आणि संशोधन
सरकार स्वदेशी सोलर उपकरणांना प्रोत्साहन देत असून, बॅटरी स्टोरेज तंत्रज्ञान आणि सोलर पॅनल्सच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यात येत आहे. यामुळे भविष्यात रात्रीच्या वेळीही सौरऊर्जेचा वापर शक्य होईल.
 
फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा आजवर दीड कोटींहून अधिक कुटुंबांनी लाभ घेतला आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी प्रति घर सरासरी ₹१२,००० पर्यंत बचत होत आहे. यामुळे एकूण ₹१,६०० कोटींची वार्षिक बचत झाली आहे. सरकारने याच गतीने या योजनेतून २०२७ पर्यंत ₹५ लाख कोटींची बचत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
 
विशेष म्हणजे, या योजनेमुळे देशभरात नवीन रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार असून, सौरउर्जा क्षेत्रात कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू करण्यात आले आहेत. नवीन भारताच्या स्वप्नासाठी हा एक सौरमार्ग आहे, जो पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि भविष्यातील ऊर्जेचा आधार ठरणार आहे.
———————————————————————————————–

 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here