वकील, जज्ज, थोडक्यात काय तर कायदेपंडीत या क्षेत्राचा विचार केला असता सर्वात महत्वाचे ग्रह म्हणजे बुध व हर्षल हे दोन ग्रह आहेत. आपल्याला माहितीच आहे बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे व हर्षल हा संशोधनाचा कारक ग्रह आहे त्यामुळे बुध ग्रहास हर्षलची साथ मिळाली तर बुद्धिमत्तेला गती मिळते.
कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या अर्थाचे प्रत्येक वाक्याचे शब्दाचे अर्थ लावणे, थोडक्यात काय तर मुद्देसूद बोलण्यात हुशार असले पाहिजे. सर्वसाधारणपणे आपण असे म्हणतो वकील म्हणजे खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करण्यात हुशार असतात. पण यामध्येच वकिलाचे खरे कौशल्य असते.
तीव्र आकलन शक्ती कोणत्याही विषयाचा खोल आभ्यास याची जरुरी असते. समोरच्याच्या बोलण्यावरती आपले बोलणे अगदी मुद्देसूद बोलून ठामपणे मांडण्याची क्षमता असावी लागते. योग्य वादविवाद हजरजबाबीपणा असावा लागतो. वायफळ बिनकामाची पोकळ बडबड कामाची नसते, आणि या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी कुंडलीमध्ये बुध व हर्षल बलवान असावे लागतात. या दोन्ही मधील एक तरी ग्रह बलवान असलाच पाहिजे. पण, ज्यावेळी आपण या क्षेत्रामध्ये काम करत असतो, त्यावेळी एखाद्या केस मध्ये कायद्याला अनुसरून अत्यंत हुशारीने योग्य असा पुरावा कोर्टापुढे ठेवणे हे काम खूपच मेहनतीचे आहे. त्यासाठी न्यायप्रिय ग्रह शनी हा कुंडलीमध्ये बलवान असावा लागतो.
विशेषतः हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट मध्ये वकिली करणाऱ्यांच्या कुंडलीमध्ये कायद्याचा कारक शनी हा ग्रह बलवान राशीला बलिष्ठ स्थानामध्ये असणे गरजेचे आहे, तरच हे लोक दिवाणी दाव्यांची कामे किंवा मोठी अपिले यशस्वी करतील, म्हणून वरिष्ठ दर्जाच्या वकिलांच्या कुंडलीत शनी बलवान असलाच पाहिजे.
बुध, हर्षल, शनी या ग्रहांनंतर वकिली क्षेत्रासाठी सर्वात महत्वाचा ग्रह म्हणजे गुरु ग्रह. गुरु न्यायाधीशाला मदत करणारा ग्रह आहे. गुरु बलवान असल्याखेरीज वकिली व्यावासाया मध्ये यश व कामे मिळत नाहीत. ज्या वकिलांच्या कुंडली मध्ये बुध व शनी या ग्रहांचे शुभ योग गुरु, हर्षल ग्रहावर होत असतात ते वकील या क्षेत्रामध्ये जास्त यशस्वी होतात. जर कुंडलीमध्ये गुरु बलवान नसेल तर रवी तरी बलवान असावा लागतो. कारण शनी, बुध, हर्षल हे ग्रह कितीही उच्च असले तरी गुरु, रवी बलवान असावे लागतात.
जर गुरु रवी चौथ्या, सहाव्या आठव्या, बाराव्या पाप स्थानी किंवा बलहीन अशुभ राशीत अशुभ ग्रहांच्या अशुभ दृष्टीयोगात असतील तर या क्षेत्रामध्ये यश मिळणार नाही.
शनी रवी, चंद्र मंगळ, गुरु या ग्रहांचे अशुभ दृष्टीयोग हर्षल बरोबर होत असतील तर वकिलाचे प्रॅक्टीसमध्ये अडथळे येतात.
स्थानाचा विचार केला असता वकील जज्ज यांचा संबंध नवमस्थानाशी येतो. नवमस्थानी शुभग्रह किंवा शुभ राशीला शुभद्रुष्टी योगामध्ये पापग्रह असेल तरी कोर्टा बरोबर उत्तम पटेल.
ज्यांच्या कुंडली मध्ये अशुभ बलहीन राशीला मंगळ, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून या सारखा एखाद्या ग्रह असेल किंवा पापग्रहांशी युक्त किंवा केंद्र प्रतियोगात असेल तर अशा वकिलांचे कोर्टाबरोबर पटणार नाही.
- कुंडली मध्ये गुरु ग्रह बलवान असेल तर दिवाणी कामे करावीत, व्यापारी व्यावसायिक लोकांशी संबंध चांगले करावेत. यश मिळते.
- शनी बलवान असेल तर शेतकऱ्यांची कामे, जमिनी संबंधी हक्क, वतनदारी, पोटगी, दिवाळखोरी, इस्टेटसंबंधी कामे केल्यास त्यामध्ये यश मिळेल.
- मंगळ बलवान असल्यास फौजदारी कामे करावीत त्यामध्ये चांगले यश मिळेल. अगदी मंगळा प्रमाणे प्लुटो ही सरकारी कामाचा कारक ग्रह आहे.
- नेपच्यून बलवान असेल तर निर्ढावलेले गुन्हेगार व त्यांच्या टोळ्या गुप्त कट व त्यासंबंधीची कामे घ्यावीत.
- शुक्र बलवान असेल तर स्त्रियांच्या हक्कासंबंधी कामे, घटस्फोट संबंधी या कडे जास्त लक्ष द्यावे त्यामध्ये यश मिळेल.
- रवी बलवान असेल तर राजकीय संस्थांची कामे. सरकार तर्फे वकिली करावी. -जोतिषविशारद मानसी पंडित
————————————————————————————–