कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे मूलभूत साधन आहे. भारतातील शिक्षणव्यवस्थेचा इतिहास अतिशय समृद्ध आहे, मात्र बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत सुधारणा करणे ही काळाची गरज बनली आहे. २९ जुलै २०२० रोजी भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण २०२० (National Education Policy – NEP 2020) जाहीर केले. ही धोरणरेषा जवळपास ३४ वर्षांनी अस्तित्वात आली असून तिचे उद्दिष्ट शिक्षण प्रणालीत मूलभूत परिवर्तन घडवणे हे आहे.
सध्याची शिक्षणपद्धती –
भारतात सध्या वापरली जाणारी शिक्षणपद्धती ही १९८६ च्या शैक्षणिक धोरणावर आधारित आहे. यामध्ये खालील वैशिष्ट्ये आहेत
- १०+२ प्रणाली – १० वर्षांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, त्यानंतर २ वर्षांचे उच्च माध्यमिक शिक्षण.
- घोकंपट्टी व गुणांवर आधारित मूल्यांकन – विद्यार्थ्यांच्या क्षमतेपेक्षा गुणांवर भर.
- केंद्रीकृत अभ्यासक्रम – राष्ट्रीय व राज्य स्तरावर समान अभ्यासक्रम, स्थानिक गरजांचा अभाव.
- सैद्धांतिक शिक्षणास प्राधान्य – कौशल्याधारित शिक्षण कमी.
- मर्यादित व्यावसायिक मार्गदर्शन – विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता ओळखण्यासाठी कमी संधी.
नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची वैशिष्ट्ये –
NEP 2020 हे धोरण शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवणारे मानले जाते. त्याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे
नवीन शैक्षणिक रचना : ५ + ३ + ३ + ४
-
५ वर्षे : पूर्वप्राथमिक + इयत्ता १-२ (Foundational Stage)
-
३ वर्षे : इयत्ता ३-५ (Preparatory Stage)
-
३ वर्षे : इयत्ता ६-८ (Middle Stage)
-
४ वर्षे : इयत्ता ९-१२ (Secondary Stage)
-
मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञानावर भर – प्राथमिक स्तरावर वाचन, लेखन व गणिती कौशल्ये यांवर भर.
-
मूल्यांकनात सुधारणा- गुणाऐवजी सतत व सर्वंकष मूल्यांकन (CCE), विद्यार्थी स्वतःचे, समवयस्कांचे व शिक्षकांचे मूल्यमापन करू शकतील.
-
बहुभाषिकता व मातृभाषेचा वापर- इयत्ता ५ पर्यंत शिकवण्याचा माध्यम मातृभाषा/प्रादेशिक भाषा असावा असा आग्रह.
-
कौशल्याधारित शिक्षण व व्यावसायिक शिक्षण- इयत्ता ६ पासून व्यावसायिक शिक्षणाचा परिचय, कोडिंग, डिजीटल साक्षरता यांचा समावेश.
-
उच्च शिक्षण क्षेत्रात सुधारणा- एकाच विद्यापीठात बहुविषय अभ्यासक्रम, Academic Bank of Credits प्रणाली.
-
राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांचा नियामक म्हणून Higher Education Commission of India (HECI) ची स्थापना.
-
Teacher Training व शिक्षकांचे सशक्तीकरण- शिक्षक प्रशिक्षणात गुणवत्ता वृद्धी, B.Ed. चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम अनिवार्य.
नव्या धोरणाचे फायदे –
-
विद्यार्थीकेंद्रित शिक्षण : अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या आवडी, कौशल्य व गरजांनुसार रचला जाणार.
-
उद्योगाशी सुसंगत शिक्षण : व्यवसायिक व कौशल्याधारित शिक्षणामुळे रोजगार संधी वाढतील.
-
नवोन्मेषाला चालना : कोडिंग, संशोधन यांना लहान वयातच सुरुवात.
-
जागतिक दर्जाचे शिक्षण : उच्च शिक्षण संस्थांचे आंतरराष्ट्रीय दर्जाशी जुळवून घेणे.
अडचणी व आव्हाने –
-
धोरणाची अंमलबजावणी ही सर्वात मोठी अडचण आहे.
-
ग्रामीण भागात शिक्षक, साधने आणि प्रशिक्षण यांचा अभाव.
-
मातृभाषेतून शिक्षणासाठी दर्जेदार साहित्याची कमतरता.
-
आर्थिक गुंतवणूक वाढवावी लागेल.
नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे भारतीय शिक्षणक्षेत्राला एक नवा दिशा व नवसंजीवनी देणारे धोरण आहे. यशस्वी अंमलबजावणी झाली तर शिक्षण अधिक समावेशक, विद्यार्थीकेंद्रित व कौशल्याधारित होईल. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन भारत एक ज्ञानाधिष्ठित राष्ट्र म्हणून पुढे येईल.
——————————————————————————————



