कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टॅबलेट आणि टी.व्ही.सारख्या उपकरणांचा वापर लहान वयातच मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर विपरीत परिणाम होताना दिसतोय. त्यामुळेच स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवणं ही केवळ सूचना न राहता, प्रत्येक पालकाची जागरूक कृती बनायला हवी.
पण मोबाईल देऊ नका, टीव्ही लावू नका, असं फक्त बोलून उपयोग नाही. मुलं फक्त ऐकत नाहीत ती पाहतात, समजतात आणि वागताना तेच अनुकरण करतात. म्हणूनच खालील काही मुद्द्यांकडे पालकांनी विशेष लक्ष देणं आवश्यक आहे..
काही गोष्टी जाणीवपूर्वक करा –
-
मुलांच्या समोर स्क्रीनचा वापर टाळा : आपणच सतत मोबाईलवर असू, तर त्यांना वाटतं की ते सुद्धा तसंच वागणं ठीक आहे.
-
स्क्रीनचा वापर मर्यादित खोलीतच ठेवा : ज्या खोलीत मुलं आहेत, तिथे स्क्रीन न वापरणं किंवा अत्यंत मर्यादित वापरणं हे सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण करायला मदत करतं.
-
वर्क फ्रॉम होमचं स्पष्ट स्पष्टीकरण द्या : जर लॅपटॉप वापर आवश्यक असेल, तर मुलांना समजेल अशा भाषेत स्पष्ट करा “हे माझं काम आहे, म्हणून मी लॅपटॉप वापरतो.”
-
स्वतःचं वर्तन जबाबदारीने ठेवा : लहान मुलं पाहून शिकतात. म्हणून आपण जे वागतो, त्याचा त्यांच्यावर खोल परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक कृती विचारपूर्वक असणं गरजेचं आहे.
-
शाळा आणि घर यांचा समन्वय ठेवा : मुलं शाळेत दररोज ४ ते ६ तासच असतात. शाळा त्यांच्या मूलभूत सवयी घडवते, पण त्या पक्क्या करण्याचं काम घरात होतं. जर शाळा आणि घर या दोन्हींचा समन्वय नसेल, तर मुलं गोंधळतात. त्यामुळे शाळा आणि पालक यांची जबाबदारी समान असून, हे दोघं एकत्र आलं, तरच खरा आणि सकारात्मक बदल शक्य आहे.
मुलांचा स्क्रीन टाइम कमी करायचा असेल, तर सुरुवात पालकांनी स्वतःपासून करावी लागेल. आपलं वर्तन, आपली शिस्त, आणि आपला दृष्टिकोन हाच त्यांच्या आयुष्याचा आरसा ठरतो. म्हणून मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्यासोबत खेळा. मोबाईलचा अतिवापर लहान मुलांच्या मेंदूवर आणि त्यांच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम करतो. अशा मुलांना एका गोष्टीत लक्ष लागणं कठीण जातं, ते पटकन विचलित होतात, आणि त्यामुळे अभ्यासातही अडथळे निर्माण होतात.
मग, मुलांना मोबाईलऐवजी कशात गुंतवायचं ?
मुलांना गुंतवणं म्हणजे त्यांना फक्त काहीतरी दाखवून शांत ठेवणं नव्हे. त्यांचं बालपण समृद्ध करायचं असेल, तर खालील गोष्टी उपयुक्त ठरतात
-
वेळ द्या आणि संवाद साधा : मुलांसोबत रोज काही वेळ खास त्यांच्या साठी राखून ठेवा. त्यांना ऐका, त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या आणि त्यांच्याशी संवाद साधा.
-
मैदानी खेळांमध्ये प्रोत्साहन द्या : धावणं, चुकणं, पडणं आणि पुन्हा उठणं हेच त्यांच्या अनुभवातून शिकण्याचा भाग आहे. आज अनेक पालक मुलांच्या सुरक्षिततेच्या चिंतेने त्यांना घरात ठेवतात, पण ही भीती त्यांच्या नैसर्गिक विकासाला अडथळा ठरते. खेळण्याने शारीरिकच नव्हे तर सामाजिक आणि भावनिक विकासही घडतो.
-
चित्रकला, हस्तकला आणि अॅक्टिव्हिटीज : रंग, माती, कागद, कातरणं, चिकटवणं ही साधी साधनं मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देतात. एकत्र बसून क्राफ्ट तयार करणं ही शिकवण्यासोबतच नात्यांची उब वाढवणारी कृती ठरते.
-
पुस्तकं वाचून दाखवा, गोष्टी सांगा : गोष्टी ही मुलांची पहिली शाळा असते. त्यातून त्यांना कल्पनाशक्ती, भाषा, नैतिक मूल्यं आणि विचार करायची सवय लागते. त्यांना प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्या आणि त्यांच्या उत्तरांना महत्त्व द्या हे त्यांचं आत्मभान वाढवायला मदत करतं.
मुलांच्या बालपणात मोबाईलचा शिरकाव झालाच आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवणं आणि त्याऐवजी त्यांना अर्थपूर्ण पर्याय देणं हीच खरी पालकत्वाची कसोटी आहे. आजच्या धकाधकीच्या जगात त्यांच्यासोबतचा वेळ म्हणजे त्यांना दिलेली सर्वात मोठी भेट असते.
त्यांना अनुभव द्या ,पडायला द्या, चुकायला द्या, उठायला शिका कारण अनुभवातून शिकणं हीच आयुष्याची खरी शाळा आहे. मोबाईल नव्हे, तर माणसं संवाद, खेळ, सर्जनशीलता आणि प्रेम या गोष्टी त्यांच्या आयुष्याला खरं खरं उजाळा देतात.
म्हणूनच मोबाईल बाजूला ठेवा आणि मुलांबरोबर जगायला शिका.