कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
देशातील अनेक शहरांची नावे बदलण्यात आल्याची गोष्ट अनेकदा आपल्या कानावर पडली असेल. मात्र, आता राज्य सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार आता राज्यातील प्लंबरचा (Plumber) दर्जा बदलण्यात येणार आहे. त्यानुसार आगामी काळात प्लंबर्सचा उल्लेख वॉटर इंजिनिअर (Water Engineer) असा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ते शुक्रवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी प्लंबरचा दर्जा बदलून वॉटर इंजिनिअर असा करण्याचा विचार बोलून दाखवला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मजुरांना सन्मान मिळावा यासाठी काही व्यवसायांच्या नावात बदल केला जाणार असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
मंगलप्रभात लोढा हे शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी बुथ समिती, बूथ रचना या सगळ्याचा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतला. यानंतर त्यांनी नाशिक मधील भाजप शहराध्यक्षांना काही सूचनाही केल्या.