कृष्णात चौगले : प्रसारमाध्यम
कोल्हापूर जिल्ह्यातील मजरे कासारवाडा ( ता. राधानगरी ) येथील बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक युवराज वारके यांनी आपल्या शेतात AI तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेती करून एक यशस्वी पाऊल उचलले आहे. एआयच्या माध्यमातून वारके यांनी केलेला ऊस शेतीचा प्रयोग राधानगरी तालुक्यात पहिलाच असल्याने त्याची दखल अनेक शेतकऱ्यांनी घेतली आहे.
भारत हा कृषीप्रधान देश असून, आजही मोठ्या प्रमाणावर पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. परंपरेने चालत आलेल्या या पद्धती शतकानुशतके उपयोगी ठरल्या असल्या, तरी बदलती हवामान परिस्थिती, पाण्याची टंचाई, वाढते उत्पादन खर्च आणि घटत चाललेले उत्पादन या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य झाला आहे.
महाराष्ट्रात ऊस हे अत्यंत पाणी खेचक आणि मजूरप्रधान पीक आहे. त्यामुळे त्यात तंत्रज्ञानाचा वापर फारसा आढळत नव्हता. परंतु अलीकडील काळात काही दूरदृष्टी असलेल्या शेतकऱ्यांनी AI चा उपयोग करून उसातील उत्पादन वाढवले आहे. याच उदाहरणांपैकी एक म्हणजे राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा येथील युवराज वारके. त्यांचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्ट शेती’कडे जाणारा मार्गदर्शक ठरत आहे.
युवराज वारके यांनी बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर करून यापूर्वी अनेक पीके घेतली आहेत. सध्या ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून दीड एकर क्षेत्रात ऊस पीक घेत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाणी व्यवस्थापन, कीड नियंत्रण, खताचे योग्य प्रमाण आणि उसाच्या वाढीचा बारकाईने अभ्यास केला. परिणामी, त्यांच्या शेतात उच्च प्रतीचा ऊसाचे उत्पादन कमी खर्चात मिळाले आहे. योग्य नियोजन व सल्ला यामुळे एकरी सरासरी १०० टन उसाचे उत्पादन हमखास होऊ शकते, असा आत्मविश्वास वारके यांनी व्यक्त केला आहे.
वारके यांनी आपल्या जमिनीत उसाचा पाला कुजवणे, शेणखताचा वापर करणे, ताग व इतर नैसर्गिक खतांचा वापर करण्यावर भर दिला आहे. पीक घेण्यापूर्वी जमिनीची मशागत देखील ते आवश्यकतेनुसार करतात. त्यामुळे जमिनीतून पिकांना पोषक तत्वे प्राप्त होतात.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते, याचा वस्तुपाठ या यशस्वी प्रयोगाने दिला आहे. आता राज्यातील अधिकाधिक शेतकरी या नव्या मार्गावर चालण्याची शक्यता आहे.
बिद्री साखर कारखान्याच्या अन्न उत्पादन वाढ अभियानात गतवर्षी सहभाग घेऊन त्यांनी आडसाली ऊस लागण करून एकरी ११४ टनांपर्यंत उत्पादन घेतले होते.
ए आय चा वापर व फायदा –
- शेतात एआय तंत्रज्ञानाशी संलग्न टॉवर उभे केले जातात.
- कोणतेही पीक घेण्यासाठी अगोदर जमिनीचा सुधारणा कशी करावी याची माहिती कळते
- पुढील १४ दिवस वातावरण कसे असणार याची माहिती मिळते.
- जमिनीत व ऊसात पाण्याचे प्रमाण किती आहे याची माहिती दररोज मिळते
- आगामी दूषित वातावरणाची सूचना व औषध फवारणी याबाबत सूचना देखील दिली जाते.
- तज्ञांचा सल्ला देखील घेतला जातो.
- खतांची माहिती आणि नेमकी गरज काय आहे याची माहिती मिळते.
- जमिनीत जी सेन्सर लावण्यात येतात त्यातून जमिनीचा ओलावा, तापमान आणि बदलाची माहिती मिळते.
- सॅटेलाईटद्वारे मॉनिटरिंग केले जाते आणि याबाबत शेतकऱ्यांना अलर्ट दिले जाते.
ए आय शेतीचे फायदे – ऊसाच्या उत्पादनात वाढ, पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत, उत्पादन खर्चात घट, जमिनीच्या सुपीकतेमध्ये वाढ, सेंद्रिय कर्ब मूल्यमापनाद्वारे भविष्यात शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा फायदा मिळतो, रासायनिक खतांच्या वापरात २५ टक्के घट, सातत्याने पीक निरीक्षणामुळे कीटकनाशकांच्या वापरात २५ टक्के बचत
————————————————————————————–