कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
अमेरिका आणि सोविएत संघ यांच्यात प्रचंड तणाव होता. या दोन राष्ट्रात सामरिक व तांत्रिक वर्चस्वासाठी मोठी स्पर्धा होती. कधी युद्धाला तोंड फुटेल हे सांगता येत नव्हते. सोविएत संघाने क्यूबामध्ये अण्वस्त्र बसवली होती, ज्यामुळे अमेरिकेला थेट धोका होता. केनेडी यांनी संयमाने आणि दूरदृष्टीने कारवाई सुरु केली. त्यांनी नौदलाच्या सहाय्याने क्यूबाची नाकाबंदी केली. तर दुसऱ्या बाजूला सोविएत संघाशी राजनैतिक वाटाघाटी करून अण्वस्त्र हटवायला भाग पाडले. परिणामी युद्ध टळले आणि अमेरिकेच्या धोरणात्मक ताकदीला जगात मान्यता मिळाली. अमेरिकेला जागतिक महासत्ता बनवण्यास सुकर वातावरण निर्माण झाले. जॉन. एफ. केनेडी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष, यांनी अमेरिकेला जागतिक महासत्ता बनवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज – २९ मे केनडी यांचा जन्मदिवस यानिमित्त त्यांचे कार्य जाणून घेऊया… !
जॉन फिट्झजेराल्ड केनेडी – जे. एफ. केनेडी यांचा जन्म २९ मे १९१७ साली ब्रुकलाइन, मॅसेच्युसेट्स, युनायटेड स्टेट्स येथे झाला. केनेडी कुटुंब हे अमेरिकेतील एक श्रीमंत आणि राजकीयदृष्ट्या प्रभावशाली कुटुंब होते. त्यांचे वडील जोसेफ पी. केनेडी हे एक यशस्वी उद्योगपती आणि सरकारी अधिकारी होते. आई – रोज केनेडी या धार्मिक आणि कुटुंबकेंद्री होत्या.
केनेडी यांचे बालपण भरभराटीच्या वातावरणात गेले. त्यांना लहानपणी अनेक आजार झाले. त्यांची प्रकृती नाजूक होती. विशेषतः पाठीच्या व कंबरदुखीच्या समस्या सतत होत्या. आठ भावंडांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे होते. त्यांचे कुटुंब राजकीयदृष्ट्या सक्रीय होते, आणि त्यांनी लहानपणापासूनच नेतृत्वगुण विकसित केले.
सुरुवातीचे शिक्षण त्यांनी विविध खाजगी शाळांमधून घेतले. पुढे त्यांनी चोते रोजन स्कूल, कँटरबरी स्कूल येथे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला आणि १९३६ ते १९४० या काळात तेथे शिकले. हार्वर्डमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध व इतिहासात विशेष लक्ष दिले. त्यांचा अंतिम प्रबंध (thesis) “Why England Slept” नावाने पुस्तक रूपात प्रसिद्ध झाले आणि खूप गाजले.
जे. एफ. केनेडी एका अत्यंत प्रभावशाली आणि श्रीमंत आयरिश-कॅथलिक कुटुंबातील होते. त्यांचे वडील जोसेफ पी. केनेडी हे एक यशस्वी उद्योजक, राजदूत (ब्रिटनमध्ये) आणि राजकीय सल्लागार होते. त्यांनी आपल्या मुलांसाठी राजकीय कारकीर्दीचे स्वप्न पाहिले होते.
केनेडी यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतली. या दरम्यान त्यांना दुसऱ्या महायुद्धात नौदलात सेवा करण्याची संधी मिळाली. नौदलातील शौर्याबद्दल त्यांना सन्मान मिळाला. ही लष्करी पार्श्वभूमी त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेला बळकट करणारी ठरली. त्यांच्या वडिलांचीही जॉनने राजकारणात उच्च पदावर काम करावे अशी इच्छा होती. या पार्श्वभूमीवर केनेडी यांनी १९४६ साली पहिल्यांदा अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहासाठी (House of Representatives) निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. १९५२ त्यांनी सेनेटसाठी निवडणूक लढवली आणि जिंकली. यावेळी त्यांनी प्रसिद्ध रिपब्लिकन उमेदवार हेन्री कॅबोट लॉज यांना हरवले. १९५६ त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारीसाठी प्रयत्न केला पण अपयशी ठरले. मात्र या प्रयत्नामुळे त्यांची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली. १९६० साली त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढविली आणि जिंकलीही. जॉन. एफ. केनेडी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांनी रिपब्लिकन उमेदवार रिचर्ड निक्सन यांच्याशी अत्यंत अटीतटीची निवडणूक लढवली. या निवडणुकीतील टेलिव्हिजन वादविवाद ऐतिहासिक ठरले. केनेडीचा आत्मविश्वास आणि देखण व्यक्तिमत्त्व लोकांच्या मनात घर करून गेले. ते अमेरिकेचे पहिले कॅथलिक राष्ट्राध्यक्ष होते.
केनेडी यांचे महत्त्वपूर्ण कार्य :
शीतयुद्ध काळातील नेतृत्व
- क्यूबा क्षेपणास्त्र संकट (1962) :
केनेडी यांचे हे काम सर्वात मोठ्या पराक्रमांपैकी एक आहे. सोविएत संघाने क्यूबामध्ये अण्वस्त्र बसवली होती, ज्यामुळे अमेरिका थेट धोका होता. केनेडी यांनी संयमाने आणि दूरदृष्टीने काम केले. त्यांनी नौदलाने क्यूबाची नाकाबंदी केली व सोविएत संघाशी राजनैतिक वाटाघाटी करून अण्वस्त्र हटवायला भाग पाडले. परिणामी युद्ध टळले आणि अमेरिकेच्या धोरणात्मक ताकदीला जगात मान्यता मिळाली. - अंतराळ स्पर्धेमध्ये आघाडी :
- केनेडी यांनी १९६१ मध्ये अमेरिकन काँग्रेसपुढे घोषणा केली की, “या दशकात माणूस चंद्रावर पाठवायचा आणि सुरक्षितपणे परत आणायचा.” या घोषणेमुळे नासाला प्रचंड आर्थिक पाठबळ मिळाले आणि अपोलो प्रोग्राम सुरू झाला. १९६९ मध्ये अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पोहोचले. हे अमेरिकेच्या तांत्रिक श्रेष्ठतेचे प्रतीक मानले जाते.
- शांतता आणि विकासासाठी धोरणे :
-
शांती सेवा दलाची स्थापना -१९६१ : हा एक स्वयंसेवी कार्यक्रम होता ज्यात अमेरिकन नागरिक विविध देशांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि विकासासाठी सेवा देत. याचे उद्दिष्ट अमेरिकेचा सकारात्मक आणि सौम्य प्रभाव वाढवणे असे होते.
-
प्रगतीसाठी मैत्री संघटन : या अंतर्गत दक्षिण अमेरिका व मध्य अमेरिका देशांसाठी सामाजिक व आर्थिक मदतीचा कार्यक्रम सुरु केला. याचे उद्दिष्ट होते, कम्युनिझमचा प्रसार थांबवणे आणि अमेरिकेची विश्वासार्हता वाढवणे.
-
अण्वस्त्र नियंत्रण व शांततेसाठी प्रयत्न – १९६३ : केनेडी यांनी यूके व सोविएत संघासोबत करार करून अणुचाचण्यांवर काही मर्यादा आणल्या. हे अण्वस्त्र स्पर्धेतील नियंत्रणासाठी पहिलं पाऊल होय.
-
जॉन एफ. केनेडी यांनी अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढवण्याचे, तांत्रिक प्रगतीत आघाडी घेण्याचे आणि युद्ध न घडवता सामरिक दबदबा राखण्याचे कार्य केले. त्यांच्या अल्प कार्यकाळातच त्यांनी अमेरिका महासत्ता बनवण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलली. केनडी यांना एक करिष्माई, तरुण आणि दूरदृष्टी असलेला नेता मानले जाते. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्याबद्दल जनतेमध्ये आकर्षण आणि आदर टिकून आहे. त्यांनी दिलेले “Ask not what your country can do for you — ask what you can do for your country” हे वाक्य आजही प्रसिद्ध आहे.






