मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
दरवर्षी कोकणात गणेशोत्सवा निमित्त मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी जात असतात. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा ताण येतो. यावर्षी चाकरमान्यांना जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रवासी वाहतुकी सोबतच चार चाकी गाड्या सुद्धा बोटीतून कोकणात नेता येणार असल्याची माहिती मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रस्ते मार्गाने कोकणात जाणारे गणेश भाविकांना यावर्षी तरी खड्डे मुक्त प्रवास करता येईल याची अद्याप खात्री नाही. गणेशोत्सवा दरम्यान लाखो मुंबईकर चाकरमानी कोकणात जात असतात.
दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमाण्यांना तीन महिने आधी रेल्वे आणि एसटी बुकिंग करावी लागते. तरीही चाकरमान्यांचे प्रवासादरम्यान हाल होतातच. यावर्षी चाकरमान्यांसाठी जल वाहतुकीचा पर्याय सुद्धा उपलब्ध करण्यात येत असून एम टू एम ही जलवाहतूक करणारी बोट लवकरच दाखल होणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
२५ मे ला होणार दाखल –
एम टू एम ही बोट येत्या २५ मे रोजी मुंबई येथे दाखल होत आहे. त्यानंतर या बोटीची पाहणी मत्स्य विभाग आणि मुख्यमंत्र्यांना मार्फत करण्यात येणार आहे. चाकरमान्यांना परवडेल अशा दरात ही वाहतूक करण्यात येणार असून माझगाव ते मालवण, विजयदुर्ग आणि रत्नागिरी या मार्गावर ही बोट सुरू होणार आहे. हा प्रवास केवळ साडेचार ते पाच तासात होणार असल्याने प्रवाशांच्या वेळेची ही बचत होणार आहे.
याशिवाय या बोटीमध्ये चार चाकी आणि दुचाकी वाहने वाहून नेण्याची क्षमता असल्याने प्रवाशांना आपली वाहने थेट बोटिंगतूनच कोकणात नेता येणार आहेत. रामदास बोटीच्या दुर्घटनेनंतर थप्प झालेली कोकणची जलवाहतूक पुन्हा एकदा नव्या अत्याधुनिक बोटी मार्फत सुरू होणार असून येत्या गणेशोत्सवापूर्वी ही सेवा सुरु होणार असल्याने कोकणातील प्रवाशांसाठी हा सुखकर प्रवास असेल असेही राणे म्हणाले.
———————————————————————————————



