मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
गेल्या काही दिवसांपासून पक्ष आणि सरकारकडे नाराजी व्यक्त करणारे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अखेर मंत्रिपदाची शपथ घेतली. मंगळवारी मुंबईतील राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात छगन भुजबळ यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. विशेष म्हणजे, या शपथविधी सोहळ्यात केवळ भुजबळ यांनाच मंत्रिपदाची शपथ देण्यात आली, त्यामुळे या निर्णयामागे राजकीय गणित असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
भुजबळ यांनी गेल्या काही काळात आपल्या नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून व शिवसेना-भाजप युतीतील स्थानाबाबतही त्यांनी वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांची नाराजी महायुती सरकारच्या अस्थैर्याला कारणीभूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
‘मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ शपथ घेतो की…’, असं म्हणत छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते.
कोणतं खातं मिळणार ?
आता आगामी मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता, सरकारने भुजबळ यांची नाराजी दूर करत पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजकीय वर्तुळात असा कयास लावला जात आहे की, भुजबळ यांचं ओबीसी समाजातील नेतृत्व, त्यांचा अनुभव आणि मतदारांवर असलेला प्रभाव पाहता, त्यांना मंत्रिपद देणे म्हणजे सरकारचा एक डावपेच असू शकतो. विशेषतः ओबीसी मतदारांच्या नाराजीवर उपाय म्हणूनही हा निर्णय घेतल्याचे जाणकार सांगतात.
दरम्यान, भुजबळ यांनी शपथविधीनंतर कोणतेेही वादग्रस्त वक्तव्य टाळत, फक्त जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पुढील काही दिवसांत त्यांचं खातं जाहीर झाल्यावर, त्यांचं राजकीय योगदान कोणत्या स्वरूपात दिसून येतं, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.
——————————————————————————————



