कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
तुरट, आंबटसर, क्वचित थोडी गोडसर चव असलेले लहान आकाराचे काळे गोल रसरसीत फळ कोणते बरे…..? हा…रानमेवा —करवंद ! उन्हाळा सुरु झाला कि एक एक फळ बाजारात यायला सुरुवात होते. या दिवसातील सर्वच फळे विशिष्ट स्वादाची, गोड, रसरशीत असतात. करवंद, इवलेशे फळ पण चवदार किती. वरून काळे मात्र आत गुलाबी गुलाबी! रासदारही आणि औषधीही तितकेच.
करवंदे ही एक काटेरी, सदाहरित झुडूप किंवा लहान वनस्पती. याचे पाने गडद हिरवी व चकचकीत असतात. काटे खूप तीव्र असतात. फुलं पांढरी किंवा गुलाबी असून त्यांना सौम्य सुवास असतो. फळं प्रथम हिरवी, नंतर जांभळी आणि पूर्ण पिकल्यावर गडद जांभळी किंवा काळसर होतात.
फळाचे वैशिष्ट्ये : चव: तुरट, आंबटसर, क्वचित थोडी गोडसर असतात. फळाच्या आत 2-4 बिया असतात. पिकल्यावर फळं जास्त रसदार आणि खाण्यास योग्य होतात.
करवंदाची शेती : करवंदाची वनस्पतीला उष्ण व कोरडे हवामान व डोंगराळ भाग जास्त मानवतो. याचे महत्त्व लक्षात आल्याने करवंदांची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. करवंदांला कोणत्याही प्रकारची माती चालते, परंतु चांगली निचरा असलेली जमीन योग्य. फार कमी पाणी लागते. बियापासून किंवा कलमांपासून लागवड केली जाते. फुलोऱ्याचा कालावधी फेब्रुवारी-एप्रिल आणि फळं पिकतात जून-ऑगस्ट दरम्यान.
उपयोग :
आहारात : लोणचं, मुरांबे, चटणी यामध्ये वापर. पक्की फळं थेट खाण्यास योग्य. जॅम, सिरप व सॉस बनवण्यासाठी वापर.
औषधात : पचनास मदत करते. भूक वाढवते. ताप, अतिसार आणि अॅनिमिया यावर उपयोगी. अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात.
आयुर्वेदात : मूळ, पाने आणि फळ यांचा वापर वेगवेगळ्या औषधांमध्ये होतो. अॅन्टीबॅक्टेरियल आणि अॅन्टीफंगल गुणधर्म.



