कोल्हापूर : प्रतिनिधी
कोकणातला उन्हाळा म्हणजे आंब्यांचा सण. पण यंदा रस फक्त आमरसात नाही, तर लोकांच्या भाषेतही भरून वाहतोय ! कोकणात तयार झालेल्या नव्या “आंबे-म्हणी” या पारंपरिक म्हणींच्या छायेत नवा कोकण अनुभवायला मिळतोय. तोही हलक्याफुलक्या उपहासाने, मिश्कील भाषेत आणि ग्रामीण वास्तवाशी नातं जपणाऱ्या दृष्टिकोनातून.
या म्हणी केवळ विनोद नाहीत, तर त्या समाजाचा आरसा आहेत. त्या कोकणाच्या मातीतून आलेल्या आहेत, जिथे आंबा केवळ फळ नाही तर संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आंबा खाणं जसं कोकणासाठी महत्वाचं, तसंच भाषेत आंबा मिसळून विचार करणं ही त्यांची खासियत बनली आहे.
आमरसाची तहान पन्ह्यावर ! (मूळ : दुधाची तहान ताकावर)- कोणीतरी आमरस खायचं स्वप्न बघतं, पण मिळतोय फक्त पन्हं. ही म्हण सांगते की इच्छा एक आणि वास्तव दुसरं! समाजात याचा वापर अशा वेळी होतो जेव्हा मोठ्या अपेक्षा पुऱ्या होत नाहीत आणि आपल्याला तडजोड करावी लागते.
औषधाला नाही आंबा नाव आंबेगाव (मूळ : अक्कल नाही काडीची पण नाव सहस्रबुद्धे)- या म्हणीत नाव व वास्तव यातील विसंगती दर्शवली आहे. एखाद्या गावाचं, माणसाचं नाव भारी, पण प्रत्यक्षात काहीच नाही हा त्यातील उपरोध!
अती पिकला आणि खराब झाला ! (मूळ : अती केलं अन् वाया गेलं) – गोड वाटणाऱ्या गोष्टींनाही मर्यादा हव्यात, नाहीतर त्या नासतात. मग आंबा असो वा आपला स्वभाव ! कोणतीही गोष्ट अति झाली की तिचं परिणाम वाईटच होतो, हे साधं पण महत्त्वाचं सत्य.
लहान कोय मोठं फळ ! (मूळ : आखुड शिंगी बहुदुधी) – छोट्या गोष्टीतून मोठा परिणाम, लहान वाटणाऱ्या व्यक्तीमधून मोठं कार्य! ही म्हण नव्या पिढीतील अॅक्शन घेणाऱ्या छोट्या पण दमदार लोकांना लागू पडते.
आपले आंबा खाणे ती आवड, दुसऱ्याचा तो हावरटपणा ! (मूळ: आपले ते प्रेम दुसऱ्याचे ते लफडे) – ही म्हण द्वैरूपी मानसिकतेवर बोट ठेवते. आपण करतो ते योग्य, पण दुसरं कुणी तेच केलं तर ‘गैर’! समाजातील दुटप्पीपणा यावर मार्मिक भाष्य.
आपला तो देवगड, दुसऱ्याचा पायरी ! (मूळ : आपला तो बाळ्या दुसऱ्याचे कार्टे) – देवगडचा हापूस सगळ्यांचा लाडका, पण आपल्याला वाटतो तोच बेस्ट. ही म्हण घरचं कौतुक आणि दुसऱ्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची मनोवृत्ती दर्शवते.
आमरस घेतला, करायला आंबा नाही पिळायला ! (मूळ : आले मी नांदायला, मडके नाही रांधायला) – या म्हणीत फक्त परिणाम हवे असणाऱ्यांची खिल्ली आहे. मेहनत नको पण थेट सुखाची अपेक्षा! आजच्या ‘झटपट यश’ मिळवायच्या मानसिकतेवर असलेलं उपहासात्मक भाष्य.
आपलीच साल, आपलीच कोय ! (मूळ : आपलेच दात, आपलेच ओठ) – स्वतःच्याच गोष्टींतून स्वतःला त्रास होणं. जसे आंब्याचं साल आणि कोय दोन्ही आपल्याच, पण कधी कधी चावते. ही म्हण आपल्याच चुका, आपल्या अडचणी यावर मार्मिकपणे प्रकाश टाकते.
आपला सडका दिसत नाही, दुसऱ्याचा लागलेला दिसतो ! ( मूळ : आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते) – ही म्हण आपल्या दोषांकडे दुर्लक्ष करून इतरांच्या छोट्याशा चुकांवर बोट ठेवणाऱ्या वृत्तीवर भाष्य करते. एखाद्या आंब्याचा सडका भाग स्वतःकडे लक्ष न देता, दुसऱ्याचा फक्त किंचित लागलेला डाग आपल्याला लगेच दिसतो. हे सांगणारी ही भन्नाट म्हण समाजातील दुटप्पी नजरेवर थेट फटकारा आहे.
नावडतीचा आमरस आंबट ! (मूळ: नावडतीचं मीठ अळणी) – ही म्हण माणसाच्या आवड-नावडीच्या आधारावर मतं बदलण्याची वृत्ती दाखवते. जिचा आमरस दुसऱ्यांना गोड लागतो, तोच नावडत्या व्यक्तीचा असल्यामुळे आपल्याला ‘आंबट’ वाटतो. म्हणजे वस्तू तशीच आहे, पण दृष्टिकोनातून गोडी-आंबटपणा ठरतो!
कुठेही जा, आंब्याला कोय एकच ! (मूळ: पळसाला पाने तीन) – ही म्हण सांगते की जग फिरा, पण काही गोष्टींचं मूळ सारखंच असतं. आंबा कुठल्याही झाडाचा असो, त्याला कोय असतेच. तशीच माणसाची मूळ वृत्तीही कायम राहते. कोणीही कितीही बाह्य रूपात बदलला तरी आतून तो जसा होता तसाच राहतो.
खा आंबा, हो जाडा ! (मूळ : पी हळद, हो गोरी) – ही म्हण फसव्या अपेक्षांवर मार्मिक टोमणा आहे. जसं हळदीने गोरेपणा येतो असा गैरसमज असतो, तसंच आंबा खाल्ल्यावर ‘आरोग्यदायक’ वाटत असलं तरी जराही जास्त खाल्लं की वजन वाढतं. पण आपण गोडीत इतके हरवलेलो असतो की वास्तव विसरतो. आधुनिक काळात ‘दिसायला झकास, पण पोटाचं काय’ या मानसिकतेवर भाष्य !
आंब्याचा सिझन तीन महिने ! (मूळ : तेरड्याचा रंग तीन दिवस) – ही म्हण फार गोड बोलणाऱ्यांवर किंवा क्षणिक झळकणाऱ्या गोष्टींवर उपहासाने प्रकाश टाकते. आंबा वर्षातून फक्त काही महिन्यांपुरताच असतो. तो हंगाम संपला की गोडीही जाते. तसंच काही माणसांचं प्रेम, बोलणं वा व्यावसायिक आकर्षण तात्पुरतं असतं. ही म्हण अशा ‘सिझनल’ वागणुकीवर चपखल बसते.
शेजाऱ्याकडून फुकट आला तरी पाटीभर आंबा खाऊ नये ! (मूळ : उस गोड लागला तरी मुळापासून खाऊ नये) – ही म्हण लोभ, अतिलालसा आणि इतरांच्या गोष्टींमध्ये अती गुंतण्यावर इशारा देते. शेजाऱ्याने आंबे दिले म्हणजे तो ‘संपत्ती’ वाटतो असं नाही . प्रमाणात खा. मोफत मिळालं म्हणून डोकं गमावायचं नाही. समाजात अशा लोकांबद्दल सावधगिरी बाळगायला शिकवणारी, अनुभवातून आलेली ही अत्यंत मौलिक म्हण आहे.
या म्हणी फक्त गमतीशीर वाटल्या तरी त्या समाज, माणूस आणि परिस्थिती यांचं गहिरं निरीक्षण सांगतात. आंबा हा जसा कोकणाच्या संस्कृतीचा राजा आहे, तसाच भाषेतील विनोद आणि उपहासही येथे राजेपद मिळवतो.
——————————————————————————————-