कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
दहावीच्या परीक्षेत क्रीडा गुण देताना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोल्हापूर विभागातील जिल्हा आणि विभागवार खेळलेल्या सरसकट गुण दिल्याने विभाग पातळीवर खेळलेल्या २७८ विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. याबाबत विद्यार्थी आणि त्यांच्या शाळांनी शिक्षण मंडळाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर बोर्डाने ही चूक मान्य करत या विद्यार्थ्यांनां वाढीव गुणांसहित सुधारित गुणपत्रिका देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात कोल्हापूर विभागीय मंडळात १ लाख २५ हजार ३८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ४ हजार ४०० विद्यार्थ्यांनी क्रीडा गुण मिळावेत म्हणून अर्ज केले होते. यामध्ये जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर खेळलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. जिल्हा पातळीवर खेळलेल्यानां ५ गुण, विभाग पातळीवर खेळलेल्यानां १० ते १२ गुण आणि राज्य पातळीवर खेळलेल्यानां १५ ते २० गुण देण्याची तरतूद आहे.
यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी २७८ विद्यार्थी हे विभाग पातळीवर खेळले आहेत. तशी प्रमाणपत्रेही त्यांनी बोर्डाकडे सादर केली आहेत. मात्र बोर्डाने या सर्वच विद्यार्थ्यांनां सरसकट ५ गुण दिले आहेत. ही बाब लक्षात येताच विद्यार्थी आणि त्यांच्या शाळांनी शिक्षण मंडळाकडे तक्रार केली आहे. बोर्डाने ही चूक मान्य करत या विद्यार्थ्यांनां वाढीव गुणांसहित सुधारित गुणपत्रिका देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.