spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeराजकीयबंड अरुण डोगळेंचं : प्रेरणा कार्यकर्त्यांना आणि इशारा नेत्यांना ..

बंड अरुण डोगळेंचं : प्रेरणा कार्यकर्त्यांना आणि इशारा नेत्यांना ..

प्रसारमाध्यम : अमोल शिंगे

राधानगरी तालुक्याला सहकार क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्यात वलय प्राप्त करून देणारं नेतृत्व म्हणजे गोकुळ दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे.. सहकारातील त्यांची ही जरी ओळख असली तर ते जास्त ओळखले जातात ते आपल्या नेत्यानां ‘टशन’ देण्याऱ्या आक्रमक राजकारणासाठी.. आत्ता ही त्यांनी गोकुळच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास नकार देऊन गोकुळच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. सत्तेत असणाऱ्या महायुतीच्या आणि विरोधात असणाऱ्या महाविकास  आघाडीच्या नेत्यानां आंगावर घेण्याचं धाडस अरुण डोंगळे यांनी या निमित्ताने दाखवलं आहे. त्यांची ही भूमिका त्यांच गोकुळचं राजकारण तारणार की संपवणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गोकुळच्या राजकारणात त्यांनी निर्माण केलेल्या राजकीय पेचाच्या निमित्ताने आज आपण त्यांच्या  राजकीय भूमिकांचा आणि त्यांच्या आक्रमक व्यक्तिमत्वाचा आजपर्यंतचा प्रवास पाहाणार आहोत.

अरुण डोंगळे हे राधानगरी तालुक्यातील एक प्रमुख सहकारी नेते असून, सध्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा सहकार क्षेत्रातील प्रवास आणि नेतृत्वाची शैली कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वपूर्ण ठरली आहे.  राधानगरी तालुक्यातून सन १९९२ साली वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी अरुण डोंगळे यांनी गोकुळ दूध संघात संचालक म्हणून प्रवेश केला.  यापूर्वी अरुण डोंगळे यांचे चुलते रंगराव डोंगळे आणि त्यांचे थोरले बंधु विजयसिंह डोंगळे हे गोकुळ मध्ये संचालक होते. हाच त्यांचा गोकुळच्या राजकारणातला एकमेव दुवा म्हणावा लागेल. सन २०१२ मध्ये राधानगरी तालुक्यातील कौलव जिल्हा परिषद मतदार संघातून त्यांनी त्यांच्या पत्नी अनिता डोंगळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते पण त्यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मंगल कलिकते यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता.

सार्वजनिक राजकारणात जनाधार मिळत नसला तरी त्यांनी आपला गोकुळच्या राजकारणातला आपला प्रभाव कमी करू दिल नाही . याची प्रचिती म्हणजे त्यांनी सन २०१० आणि २०२३ असे दोन वेळा गोकुळचे अध्यक्ष पद भूषविले आहे. त्यांची गोकुळ आणि सहकारात भरीव कामगिरी आहे. त्यांनी दूध संघाच्या धोरणनिर्मिती आणि विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, संघाने तांत्रिक सुधारणा, दूध संकलन वाढ, आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. ही झाली त्यांची सामाजिक क्षेत्रातील भूमिका. त्यांची राजकारणातील भूमिका ही त्याच्या पूर्णपणे विपरीत दिसून येते. त्यांची राजकीय भूमिका आजपर्यंत कधीच स्थिर राहिलेली नाही. नेते आणि पक्षानां अडचणीत आणण्याची त्यांची भूमिका संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याने पाहिली आहे. जिल्ह्याचे नेते, पक्ष आणि अरुण डोंगळे यांच्यात नेहमी बंडाचचं नातं पाहायला मिळालं आहे.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षात असून सुद्धा बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली. त्यांच्या या बंडखोरीमुळे कॉँग्रेस राष्ट्रवादी कॉँग्रेस या आघाडीचे अधिकृत उमेदवार के. पी. पाटील यांचा मतविभागणी मुळे पराभव झाला होता. यानंतर त्यांनी आपल्या मुलाला राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटात स्थिर केलं आणि आपण स्वतः माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कायदेशीर सदस्यत्व न घेता सामील झाले. आशा पद्धतीने त्यांनी राजकीय पक्षानां देखील झुलवत ठेवण्याचं कसब दाखवून आपलं दबावाचं राजकारण केलं आहे.

महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली अरुण डोंगळे यांनी सुमारे ३० वर्षे गोकुळ दूध संघावर वर्चस्व ठेवले होते. महादेवराव महाडिक आणि अरुण डोंगळे ही जोडी तुटायची नाही असे म्हटले जात होतं मात्र २०२१ मध्ये झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत दाखल होऊन महादेवराव महाडिकांनाच धक्का देऊन कित्येक वर्षे गोकुळवर वर्चस्व असणाऱ्या महादेवराव महाडिकांनां गोकुळच्या सत्तेवरून पायउतार होण्यास आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना मदत केली. इथे देखील त्यांची बंडाची परंपरा दिसून आली.

२०२३ मध्ये त्यांच्या या सहकार्याची दखल घेऊन आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना गोकुळमध्ये अध्यक्ष पदाची संधी दिली. हे अध्यक्षपद २०२५ पर्यंत राहाणार असे ठरले होते. २५ मे रोजी ठरल्याप्रमाणे त्यांची मुदत संपत आहे मात्र त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार देऊन पुन्हा बंडखोरीचं हत्यार बाहेर काढून आपल्याच आघाडीच्या नेत्यानां राजकीय धर्मसंकटात टाकलं आहे. सन २०१३ मध्ये आमदार महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील असताना अरुण  डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार देऊन न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते. परंतु तिथे त्यानां अपयश आल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

सध्या त्यांच्या या बंडाच्या भुमिकेमुळे राज्याच्या नेत्यांची देखील डोकेदुखी वाढली आहे. हा सगळा इतिहास पाहता अरुण डोंगळे यांनी माजी आमदार महादेवराव महाडीक, आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ या जिल्ह्याच्या नेत्यानां अंगावर घेतलं आहेच शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यानां सुद्धा अंगावर घेतलं आहे. अरुण डोंगळे यांच्यासारखा कार्यकर्ता जिल्ह्याच्या आणि राज्याच्या नेत्यानां बंडखोरी करून अंगावर घेण्याचं धाडस कसं करतो? हा प्रश्न संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला पडला आहे. सन १९९२ पासून अरुण डोंगरे गोकुळ दूध संघाच्या राजकारणात आहेत. राधानगरी तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील इतर तालुक्यात देखील त्यांचे ३०० हून अधिक ठराव आहेत. या ठरावांच्या जोरावरच अरुण डोंगळे आजपर्यंत नेत्यानां अंगावर घेण्याचं धाडस करत आहेत. पण हे धाडस प्रत्येक वेळी यशस्वी होईलच असे नाही.

आपलं उपद्रव्य मूल्य वाढवणारा कार्यकर्ता नेत्यानां नकोसा असतो हे आपण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिलं आहे. एखादा कार्यकर्ता आपलं उपद्रव्य मूल्य दाखवून बंडखोरीचं निशाण फडकवित असेल तर नेते त्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करून त्याचं राजकीय मूल्य कमी करतात आणि यासाठी आवश्यक असल्यास आपल्या विरोधकाचं देखील सहकार्य घेतात.  अरुण डोंगळे यांनी आत्तापर्यंत केलेल्या अस्थिर आणि बंडखोरीच्या राजकारणाला खिळ घालण्यासाठी त्यांनी दुखवलेले नेते कधी एकत्र येतील, हे सांगता येत नाही.

डोंगळे सारख्या कार्यकर्त्याने नेत्यांचा आधार घेत सत्ता साधनांचा योग्य पद्धतीने संचय केला आणि याच साधनांचा वापर करत आपल्याच नेत्यांवर अरुण डोंगळे यांनी ज्या पद्धतीने दबावतंत्राचं राजकारण केलं आहे ते पाहता सध्याच्या बदलत्या राजकारणात डोंगळे कार्यकर्त्यानां प्रेरणा स्त्रोत राहतील. अरुण डोंगळे यांच्या राजकारणाच्या एका स्वतंत्र शैलीचा आणि आत्ताच्या त्यांच्या भुमिकेचा त्यांच्याच राजकारणावर काय परिणाम होईल, हे येणारा काळच ठरवेल. आजच्या परिस्थितीत राज्यातील आणि जिल्ह्यातील काही अदृश्य शक्ती राजकीय लाभासाठी डोंगळेंना तात्पुरता छुपा पाठींबा देत असतीलही तरीही हे बंड मोडून काढण्यात नेत्यांचे कसब लागणार नाहीतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणाऱ्या आघाड्यांमध्ये एखाद्या सक्षम कार्यकर्त्याने स्वतः जवळील बलस्थानांचा वापर करत डोगळेंसारखा डाव खेळायचं ठरवलंच तर मात्र पक्ष कोणताही असो नेत्याला डोकेदुखी होणारच. 

 

 

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments