कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
देशभरात हवामान बदलले असून अनेक भागांमध्ये वादळाचं सावट दिसत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पुढच्या २४ तासांमध्ये राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा जारी करत यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, कोकण किनारपट्टी भागात ढगाळ वातावरणासह हवामान काहीसं दमट असेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्याच्या सातारा, पुणे, नाशिक, कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. या इशाऱ्यामुळं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे, तर पावसाच्या या सरी शेतपिकांचं नुकसान करण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यात गेल्या ४८ तासांपासून पावसानं हजेरी लावल्यामुळं ऊन्हाची तीव्रता कमी झाली असून, तापमानातही सुखद घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. बहुतांश भागांमध्ये हवेत गारवा निर्माण झाला असून, राज्याच्या पश्चिम घाट परिसरामध्ये पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.
चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यावर पावसाचे ढग घोंगावत असल्याचं सांगण्यात येत आहे. समुद्रसपाटीपासून साधारण १.५ ते ७ किमी उंचीवर सक्रिय असणाऱ्या या प्रणालीमुळे कोकणासह उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या वेगावरही ही प्रणाली परिणाम करताना दिसत आहे.
मान्सूनसाठी वर्तवण्यात आलेल्या काही सुरुवातीच्या अंदाजांनुसार १३ मे च्या आसपास मान्सूनचे वारे अंदमान आणि निकोबार इथं दाखल होतील. त्यानंतर ते पुढील प्रवास सुरू करतील. दरम्यान, सध्या सुरु असणारा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस म्हणता येणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. एकाएकी वाढलेली उष्णता आणि मध्य भारतातील वाऱ्याची चक्राकार स्थिती यासह अरबी समुद्रातील वाऱ्यांमुळं पावसाचा मारा सुरु असल्याचं इथं स्पष्ट करण्यात येत आहे.
————————————————————————————————



