कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) तांदळाच्या दोन सुधारित जाती विकसित केल्या आहेत. पहिल्या जीनोम-संपादित तांदळाच्या या जातींचे औपचारिक अनावरण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले.
नवीन विकसित केलेल्या तांदळाच्या जातींना डीआरआर धान १०० (कमला) आणि पुसा डीएसटी तांदूळ १ असे नाव देण्यात आले आहे. या जातींचे उत्पादन पारंपारिक जातींपेक्षा २०-३०% जास्त असणार आहे. तसेच त्याला पाणी कमी लागणार आहे, असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, तांदळाच्या या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती देशातील दुसऱ्या हरित क्रांतीचा मार्ग मोकळा करतील. यामुळे धान्याचे उत्पादन वाढणार आहे. कमी पाण्यात पिके वाढतील आणि खर्चही कमी होईल. तसेच बदलत्या हवामानातही या जाती चांगले उत्पादन देतील. डीआरआर धान १०० (कमला) त्याच्या मूळ जातीपेक्षा सुमारे २० दिवस आधी तयार होणार आहे. त्याचा पेरणीपासून उत्पादन निघण्यापर्यंतचा कालावधी १३० दिवसांचे असले. चांगले उत्पादन, ताण सहनशीलता आणि हवामान अनुकूलता यासाठी हे संशोधन आणि विकसित केले गेले.
महाराष्ट्रासाठी या जातीची शिफारस
आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल यासारख्या प्रमुख धान उत्पादक राज्यांसाठी आयसीएआरने या धानाच्या जातींची शिफारस केली आहे. चीन आणि जपानसारख्या देशांमध्ये जीनोम-संपादित तांदळाच्या जाती यापूर्वी विकसित केल्या गेल्या आहेत. परंतु त्यापैकी अनेकाचे संशोधन पूर्ण झाले नाही. फक्त काहीच व्यापारीकरणाच्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत. आयसीएआरने २०१८ मध्ये भाताच्या जीनोम-संपादन संशोधन प्रकल्प सुरू केला होता.
भारताची बासमती तांदूळची निर्यात ४८,००० कोटी रुपयांची आहे. कृषीमंत्र्यांनी सांगितले की, भविष्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाची खात्री करावी लागेल. ही जबाबदारी आपल्या कृषी शास्त्रज्ञांच्या खांद्यावर आहे. यावेळी कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी वजा-पाच अधिक दहाचा एक नवीन फॉर्म्युला सांगितला. या सूत्रात भात लागवडीचे क्षेत्र ५० लाख हेक्टरने कमी करणे आणि उत्पादन १ कोटी टनांनी वाढवणे समाविष्ट आहे.
कृषी सचिव देवेश चौधरी यांनी सांगितले की, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन तांदळाच्या या जातींचा विकास करण्यात आला आहे. या दोन्ही जाती उत्पादन अधिक देणार आहे. तसेच गुणवत्तेमध्येही त्या दर्जेदार असणार आहे. या जाती आता सार्वजनिक आणि खासगी समुदायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
—————————————————————————————