कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रात मान्सून नियोजित वेळेपेक्षा एक आठवडा आधी येणार आहे. १५ मे च्या आसपास अंदमान निकोबारमध्ये, तर १० ते ११ जूनच्या आसपास मुंबईत मान्सून येईल. मान्सूनचा हंगाम १०५ टक्के राहील तर मराठवाड्यात मात्र ८० टक्केच मान्सून राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील तापमान जवळपास या दोन महिन्यात ४५ अंश डिग्री सेल्सियसवर पोहोचलं आणि त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाचे ढग आले. ४ ते ६ मे दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि काही मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळीचं संकट आहे. मार्च आणि एप्रिल महिना तर नकोसा झाला इतकी उष्णता वाढली होती. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता मान्सून कधी येणार याची प्रतीक्षा आहे.
भारतातील नैऋत्य मान्सून १ जून २०२५ च्या सुमारास केरळमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. आयएमडीने २०२५ च्या हंगामात “सामान्यपेक्षा जास्त” मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या १०५% पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ जून-सप्टेंबर या कालावधीत मान्सून नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.
मुंबईत १० ता ११ जूनच्या आसपास मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे. दुसरीकडे मराठवाड्यात मात्र यंदा ८० टक्केच मान्सून राहील असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे यंदाही पाणीप्रश्न भीषण होऊ शकतो. मराठवाड्यावर पाणीबाणीचं संकट अधिक तीव्र होऊ शकतं. जून महिन्यात मुंबई, ठाणे आणि उपनगरात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून येईल असा प्राथमिक अंदाज आहे.
दुसरीकडे मे महिन्यात देखील सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे अवकाळी पाऊस राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये ५५ डिग्रीपर्यंत तापमान जाईल असा मेसेज व्हायरल होत होता तो खोटा असल्याचा दावा देखील हवामान विभागाकडून करण्यात आला आहे. ५५ डिग्रीपर्यंत तापमान जाणार नाही. अवकाळीमुळे तापमानात चढ उतार होण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं आहे.
———————————————————————————————