कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापुरात अजूनही जुन्या कोल्हापुरच्या आठवणी जागवणाऱ्या वास्तू आढळत आहेत. मग त्या शहराच्या कोणत्याही भागात सापडत असतात. शहराच्या मध्यभागी असणाऱ्या गांधी मैदाना बाहेरून नव्याने काढण्यात येत असलेल्या मोठ्या गटाराचे खोदकाम सध्या सुरू आहे. हे काम सुरू असताना जुन्या शाहूकालीन हौदाचे असणारे अस्तित्व उघड झाले आहे. गटारासाठी खोदताना उभा मारुती चौकात आढळलेले हे दगडी पाट पाहायला नागरिकांनी गर्दी होत आहे.
गांधी मैदानाबाहेरून नव्याने गटाराचे खोदकाम सध्या सुरू आहे. यापूर्वी स्थानिकांनी विरोध केल्यामुळे बराच काळ हे काम ठप्प होते. त्यानंतर ठेकेदाराला परवानगी मिळाल्यामुळे सध्या हे काम वेगाने सुरू आहे. कामगारांनी गेल्या काही दिवसांपासून या परिसरात खोदून ठेवले आहे. त्यामुळे साकोली कॉर्नर ते उभा मारुती चौक या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
दरम्यान, सध्या हे काम उभा मारुती चौकात आले आहे. उभा मारुती चौक ते साकोली कॉर्नर असे गटाराचे खोदकाम होणार आहे. गेल्याच आठवड्यात हे काम सुरू असताना कामगारांना याठिकाणी असणाऱ्या जुन्या शाहूकालीन हौदाचे असणारे अस्तित्व उघड झाले. हे काम सुरू असताना संस्थान काळात हौदासाठी वापरलेले दगडी पाट लोकांसमोर आले. या दगडी पाटांमुळे आजही शाहू महाराजांचे प्रजेसाठी असलेले काम अधोरेखित झाले आहे. शनिवारी गटारासाठी खोदकाम करत असताना हे दगडी पाट लोकांना पाहायला मिळाले आणि लोकराजा शाहू महाराजांच्या कामाचा दर्जा, नियोजन याबाबत शिवाजी पेठेत याची चर्चा सुरू झाली.
——————————————————————————————






