कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी मे महिन्यामध्ये बुध्द पौर्णिमे दिवशी प्राणी गणना करण्यात येते. ही प्राणी गणना राधानगरी व सागरेश्वर अभयारण्य येथील जंगलातील विविध ठिकाणी होणार असून यात सहभागी होण्यास इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वन्यजीव विभाग अंतर्गत दि. १२ मे व १३ मे २०२५ रोजी बुध्द पौर्णिमे दिवशी रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशामध्ये राधानगरी अभयारण्य (कोल्हापूर) व सागरेश्वर अभयारण्य (सांगली) मध्ये प्राणीगणनेचा कार्यक्रम केला जातो. प्राणी गणनेमध्ये निसर्गप्रेमींना एक दिवस जंगलात राहण्याचा तसेच प्राण्याचे दर्शन, आवाज, वनसंपदा व जैवविविधतेचा अनुभव मिळतो. दरवर्षी प्रणीगणनेस उदंड प्रतिसाद मिळत असतो. यातून जनसामान्यांना वन्यप्राणी व जंगलामध्ये वनविभागामार्फत करण्यात येत असलेली कामे, वनसंपदा टिकविण्यासाठी वनविभागाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न याची जवळून माहिती होते. त्यांच्याकरीता हा एक दिवसाचा अनुभव कायम स्मरणात राहणारा असतो.
कोल्हापूर वन्यजीव विभागातील राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यामध्ये एकूण ३२ मचाण उपलब्ध असून प्राणीगणनेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक उमेदवारांनी कोल्हापूर वनविभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जावून प्राणीगणने करीता उपलब्ध अर्ज डाऊनलोड करुन भरुन या कार्यालयाच्या www.census2025@gmail.com या ई मेल वर ५ मे २०२५ अखेर आवश्यक कागदपत्रांसह PDF स्वरुपात पाठवावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस.एस.पवार यांनी केले आहे.
आपले अर्ज वरील कालावधीत असले पाहिजेत. ई मेल सोडून इतर कोणत्याही स्वरुपात अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच मचान मर्यादित असल्याने प्रथम ई मेल येणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यावी. प्रणीगणने करीता सहभागी होण्यासाठी अर्जदारास रक्कम एक हजार रुपये भरणे आवश्यक आहे. फी आपले नामांकन अर्ज मंजूर झाल्यानंतर भरावी लागेल.
अर्ज भरण्याबाबत शंका असल्यास –
विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) कोल्हापूर यांचे कार्यालय, विचारेमाळ, सदर बाजार, कोल्हापूर- ४१६००३ या पत्यावर तसेच इमेल www.mahaforest.gov.in व www.census2025@gmail.com दूरध्वनी ०२३१- २६६९७३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे.
——————————————————————————————



