प्रसारमाध्यम डेस्क
महागाईच्या वाढत्या प्रमाणामुळे एक कोटीची किंमत ९४% नी घटून ५ लाख रुपये झाली तर? आहे ना मध्यमवर्गीयांसाठी धोक्याचा इशारा? हो जयेश ठक्कर या एका प्रसिद्ध आर्थिक सल्लागारांनी त्यांच्या X या सोशल मीडियावर वाढत्या महागाई दरावरून मध्यमवर्गीयांच्या बचतीवर कसा परिणाम होणार आहे ते सांगितले आहे.
मध्यमवर्गीय लोक हे बँक बचत आणि मुदत बंद ठेव या पारंपारिक पद्धतीनेच प्रामुख्याने पैशाची बचत करत असतात. जयेश ठक्कर यांच्या मते ही पारंपारिक बचत करणाऱ्या लोकांना वाढत्या महागाई दरामुळे फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ६% महागाई दर ५० वर्षात एक कोटी रकमेचे ९४% मूल्य कमी करून त्याची किंमत ५लख ४२ हजार होऊ शकते. हे पटवून सांगण्यासाठी त्यांनी त्यांच्या X पोस्टवर एक टेबल देखील दिले आहे.
एक कोटीची किंमत १० वर्षात ४४% ने कमी होऊन ५५ लाख ८४ हजार एवढी होईल तर २० वर्षात ३१ लाख १५ हजार एवढी होईल आणि ५० वर्षात ५ लाख ४२ हजार रुपये एवढी किंमत होईल असं या टेबलमध्ये म्हटलं आहे. याचा अर्थ महागाई दाराच्या तुलनेने बचतीचे पैसे लवकर वाढले नाहीत तर त्याचे मूल्य वेगाने कमी होते.
या आकडेवारीचा विचार करता मध्यमवर्गीयांना एक धोक्याचा इशाराच दिला गेला आहे. हा धोका भविष्यात टाळायचा असेल तर मध्यमवर्गीयांणी पारंपारिक बचती बरोबरच म्युच्युअल फंड, इंडेक्स फंड, स्थावर मालमत्ता , सोने आणि डिजिटल गोल्ड, ग्रीन बॉंड यासारख्या जलद आणि जादा परतावा देणाऱ्या गुंतवणुकीमध्ये तज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करण्याची गरज आहे.
————————————————————————————————-