अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेतलाच नाही ; माजी आमदार राजेश पाटील यांना अश्रू अनावर

0
274
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असून चंदगड येथील नागरी सत्कार सोहळ्यात अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिला. चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश पाटील यांचा पराभव झाल्यामुळे अजित पवारांनी फेटा बांधण्याचे टाळले.
विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील यांच्या मतदारसंघासाठी आपण भरभरुन निधी दिला.१६०० कोटी रुपयांची विकासकामे मतदारसंघात झाली. मात्र, येथील नागरिकांना राजेश पाटील यांचा पराभव केला. जिल्ह्यात महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आले, पण राजेश पाटील पराभूत झाले. गड आला पण सिंह गेला, अशी भावना अजित पवारांनी यावेळी बोलून दाखवली. तसेच, सत्कार सोहळ्यात फेटा बांधणे टाळले.  

उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी, येथील राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील यांच्याकडून अजित पवारांचा नागरी सत्कार करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव झाला, त्याचा संदर्भ देताना माजी आमदार राजेश पाटील यांना अश्रू अनावर झाले. बोलताना राजेश पाटील यांना हुंदका दाटून आला, सर्व काही सुरळीत असताना माशी कुठं शिंकली हे मला माहीत नाही. पण, ही जनता कायम आपल्यासोबत राहिलं. अजित दादांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेलं पाहिल्याशिवाय आपण वाढदिवस साजरा करणार नाही. माझे डोळे मिटण्याच्या आधी मला अजित दादांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेलं पाहायचं आहे, असं देखील राजेश पाटील म्हणाले. 

हसन मुश्रीफांनीही केला दादांचा उल्लेख –

मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आपल्या भाषणात अजित पवार यांनी फेटा बांधून का घेतला नाही याचा उल्लेख केला. चंदगड विधानसभा मतदारसंघात दादांनी प्रचंड निधी दिला होता. त्यामुळे राजेश पाटील निवडून येतील असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. राजेश पाटील यांनी आता लोकांच्या वैयक्तिक कामासाठी वेळ घालवला पाहिजे, तुम्हाला निधी मिळणार आहे असे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. तसेच, आता कोणत्याही नेत्याने घरात बसून सदस्य नोंदणी करून घ्यायची नाही, असेही मंत्री महोदयांनी सांगितलं. 

गड आला पण सिंह गेला –

चंदडगमध्ये राजेश पाटील यांचा पराभव झाला याची खंत वाटते. या मतदार संघात आम्ही १६०० कोटी रुपयांचा निधी दिला, मी कायम सांगतो, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. दर महिन्याला लाडकी बहीण योजनेला ४५ हजार कोटी जातात. २०२४ साली राजेश पाटील यांचा पराभव झाला याची खंत वाटते. नरसिंग गुरुनाथ यांना एकदा ११ मतांनी निवडून दिलं, काय अजब लोकं आहेत राव, असेही अजित पवार म्हणाले. जिल्ह्यात महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आले पण आमचे राजेश पाटील हे निवडून आले नाहीत. म्हणजे गड आला पण आमचा सिंह गेला, याचं मला खूप दुःख आहे, अशा शब्दात अजित पवारांनी राजेश पाटील यांच्या पराभवाची खंत बोलून दाखवली. 

दरम्यान, अजित पवार यांनी भाषण करतेवेळी कार्यकर्त्यांना डी झोनमध्ये बसण्यास परवानगी दिली. पोलिसांना सूचना देऊन उन्हात उभारलेल्या कार्यकर्त्यांना सावलीत बसवलं. जनता आहे म्हणून आम्ही आहोत, नाहीतर आम्हाला कोण विचारतं, असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांबद्दलची आपली भावना बोलून दाखवली.

———————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here