राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत आपल्या सरकारच्या शंभर दिवसांचा रिपोर्ट कार्ड जारी केला. १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पाच मंत्रालयीन विभागांचे सचिव, पाच मंत्रालयीन विभागांचे आयुक्त, पाच जिल्हाधिकारी, पाच पोलीस अधीक्षक, पाच मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), चार महापालिका आयुक्त,तीन पोलीस आयुक्त, दोन विभागीय आयुक्त आणि दोन पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक यांची यादी जाहीर करण्यात आली.
भाऊ-दादांच्या मंत्र्यांची सरशी, शिंदे गटाचे काय ?
पहिल्या पाच सर्वोत्तम विभागांमध्ये महिला व बाल विकास विभागाने बाजी मारली आहे. या विभागाला ८० टक्के गुण मिळाले आहे. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ७७.९५ गुण मिळाले. कृषी विभाग ६६.१५ गुण मिळाले आहे. तर, ग्रामविकास विभागाला ६३. ८५ आणि परिवहन व बंदरे विभागाला ६१.२८ गुण मिळाले आहेत.
सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागात पहिल्या पाचमध्ये सहा मंत्र्यांच्या विभागांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे दोन, भाजपचे तीन तर शिवसेना शिंदे गटाच्या एका मंत्र्याचा समावेश आहे. पहिल्या स्थानी अदिती तटकरे यांचे खाते आहे. तर, शिवेंद्रराजे भोसले यांचे खाते दुसऱ्या क्रमांकावर असून माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते तिसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांच्या खात्याने चौथे स्थान पटकावले आहे. तर, पाचव्या स्थानावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा विभाग आहे.
राजकारण पेटणार?
फडणवीस सरकारच्या या रिपोर्ट कार्डमुळे मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची कामगिरी फारशी प्रभावी राहिली नसल्याचे आता या रिपोर्ट कार्डमुळे समोर आले आहे. त्यामुळे आता शिंदे गटाच्या मंत्र्यांवर आपली कामगिरी उंचावण्याचा दबाव असणार आहे. अन्यथा त्यांच्याकडील खाते काढण्याबाबत एकनाथ शिंदे यांना भाजपकडून विचारणा होण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिंदे यांची अजितदादांकडून कोंडी होत असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाची समीक्षा घेणे, पुनर्विचार करणे अथवा त्याला रद्द करण्यात आले आहे. त्यावरून शिंदे गटात नाराजीचे वातावरण असल्याचे म्हटले जात आहे. आता रिपोर्ट कार्डमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
——————————————————————————