मुंबई : सुरेश ठमके
राज्यात महायुती सरकारमधील तिन्ही पक्षात सर्वश्रेष्ठ कोण ? यावरुन चढाओढ सुरू असताना आता १०० दिवसांच्या कृती आऱाखड्याचा निकाल या आठवड्यात येण्याची शक्यता असल्याने मंत्र्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. १०० दिवसांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्री आणि एकूण पाच विभाग अग्रेसर असल्याचे केंद्र सरकारच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या कंपनीकडून केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाल्याचे समजते. अंतिम निकाल एका आठवड्यात अपेक्षित आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या १०० दिवसांच्या आढाव्यात मंत्रालयातील ८ विभागांची कामगिरी चांगली असल्याचे या सर्वेतून पुढे आले आहे. त्यामुळे महायुतीत १०० दिवसांच्या कार्यक्रमात बाजी कोण मारणार ? हे या आठवड्यातील निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
सेनेचे शिलेदार आघाडीवर…
तळागाळातील लोकांपर्यंत त्या विभागाच्या योजना पोहोचवण्यासाठी आणि समान्य लोकांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार केला. दरम्यान, या आठवड्यात या शंभर दिवसाचा निकाल अपेक्षित आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार जो सर्वे समोर आलाय, त्या सर्वेत शिंदें यांचे पाच मंत्री आणि त्यांचे पाच विभाग आघाडीवर आहेत. त्यामुळं पहिली परीक्षा शिंदेंच्या मंत्र्यांनी पास केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी कोण?
सर्व्हेनुसार दुसऱ्या स्थानी भाजपाचे दोन विभागातील मंत्री आहेत. आणि तिसऱ्या स्थानी अजित पवार पक्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका विभागाचा समावेश आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. विभागातील महिला व बालविकास विभाग याची चांगली कामगिरी असल्याचे बोलले जातेय. तसेच या विभागाचा शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात समावेश आहे. त्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तम काम केल्यामुळे त्यांचाही समावेश असल्याचे सर्वेतून समोर आले आहे.
विकासकामांची स्पर्धा आणि झोनचे मूल्यमापन…
तिन्ही पक्षांमध्ये जरी श्रेवादाची लढाई असली तरी पायाभूत सुविधा आणि विकास कामांसाठी महायुतीत निकोप स्पर्धा असल्याचं दिसून येत आहे. १०० दिवसांमध्ये एकूण ६० विभागांपैकी चांगली कामगिरी करणाऱ्या ८ विभागांची निवड करण्यात आली आहे. तसेच या विभागातील कामांचे मूल्यमापन ठरविण्यासाठी विभागांना रंगीन कोड देण्यात आले आहेत. ग्रीन झोन, यलो झोन आणि रेड झोन अशी विभागांची विभागणी केली जाणार आहे. उत्तम कामगिरी करणाऱ्या विभागाल ग्रीन झोनमध्ये टाकले आहे, मध्यम कामगिरी असणाऱ्या विभागाला यलो झोनमध्ये…, आणि खराब कामगिरी असणाऱ्या विभागाला रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. अशा प्रकारे ही वर्गवारी करण्यात आली आहे.
मंत्र्यांची चांगलीच कामगिरी राहील…
एखादा मंत्री चांगला असून चालत नाहीतर, मुख्यमंत्रीही चांगला लागतो. आणि आमचं महायुती सरकार हे तळागळातील सामान्य लोकांसाठी काम करते. त्यामुळे आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. कुठल्या एका पक्षाची चांगली कामगिरी झाली. दुसऱ्या पक्षाची कामगिरी चांगली नाही, असं आम्ही बघत नाही. तर महायुती हे आमचं कुटुंब आहे. त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. जनतेच्या हिताचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात. या आठवड्यात जरी निकाल अपेक्षित असला तरी नक्कीच मंत्र्यांची कामगिरी ही चांगलीच राहील, असा विश्वास भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांनी व्यक्त केला आहे. १०० दिवसांच्या कार्यक्रमात आमचा पक्ष आघाडीवर आहे. आमच्या पक्षातील मंत्री आणि आमदार हे जनतेची सेवा करण्यात आणि त्यांची कामे करण्यात आघाडीवरती आहेत. याचे आम्हाला समाधान आहे. पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तळागाळातील लोकांमध्ये जाऊन भेटतात. लोकांच्या समस्या, प्रश्न सोडवतात. त्यामुळे जो मुख्यमंत्र्यांनी १०० दिवसाच्या कृती आराखडा दिला होता. त्याच्यात महायुती तसेच आमचे पक्ष चांगली कामगिरी करताना दिसतील, यात अजिबात शंका नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाची प्रवक्ते अरुण सावंत यांनी दिली आहे.
आमची कामगिरी समाधानकारक…
दरम्यान, महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी तिन्ही पक्षांमध्ये कुठल्याही कामासाठी स्पर्धा नाही. शंभर दिवसांमध्ये आमच्या पक्षाचा विचार केल्यास आमच्या पक्षाकडे सहकार, अर्थ आणि महिला व बाल विकास आदी खाती आहेत. या खात्यातील मंत्र्यांनी वारंवार जनता दरबार घेऊन आणि लोकांमध्ये मिसळून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा 100% प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही वारंवार आमदारांच्या, मंत्र्यांच्या बैठकीतून लोकांचे तातडीने प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ज्या विभागातील आहेत, ते महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांचाही शंभर दिवसांमध्ये उत्तम ८ विभागात समावेश होत आहे. त्यामुळं नक्कीच १०० दिवसांमध्ये महायुती सरकारच्या तिन्ही पक्षातील मंत्र्यांनी उत्तम कामगिरी केली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
प्राथमिक सर्वेनुसानुसार मंत्र्यांची कामगिरी कशी…
शिवसेना (शिंदे) –
– गृहनिर्माण विभाग – एकनाथ शिंदे
– सार्वजनिक आरोग्य विभाग – प्रकाश आबिटकर
– उद्योग विभाग – उदय सामंत
– सार्वजनिक बांधकाम विभाग - एकनाथ शिंदे
– परिवहन विभाग – प्रताप सरनाईक
भाजप –
– ग्रामविकास विभाग – जयकुमार गोरे
– ऊर्जा विभाग – देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) –
– महिला व बालविकास विभाग – आदिती तटकरे
————————————————————————————-