कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
गारेगार, पाणीदार आणि गोडगोड कलिंगड उन्हाच्या तडाख्यात कुणाला नकोसे वाटेल ? उन्हामुळे घसा कोरडा पडतो, भलतीच तहान लागलेली असते. रस्त्यावर पाणी, रस, ताक या गाड्यावर गर्दी असते. ठिकठिकाणी लावलेल्या कलिंगडच्या गाड्या व त्या वरील लाल भडक कलिंगड आपल्याला जास्त आकर्षित करतात.
फेब्रुवारी महिना सुरु झाला उन्हाळा आला की कलिंगडचे बाजारात आगमन होते. वरून हिरवे-पोपटी दिसणारे हे फळ आत तितकेच लालभडक असते. झाडाखाली किंवा छताखाली कलिंगडचे ढिगच्या ढीग मांडून विक्रेते बसलेले असतात. कलिंगडचा हिरवा-पोपटी रंग गारवा देणारा असतो आणि लालभडक पाणीदार गाभ्यामुळे जिभेला पाणी सुटते. असे गोड-गार कलिंगड किती खाऊ असे होते.
कलिंगडमध्ये ९२ टक्के पाणी असते. उन्हाळ्यात नैसर्गिक ऊर्जास्रोत देणारे कलिंगड हे एक उत्कृष्ट फळ आहे. कलिंगड हे ए. सी. आणि बी. ६ या जीवनसत्वाचा उत्तम स्रोत असणारे फळ आहे.
कलिंगडमुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास कलिंगड सहाय्यक ठरते. कलिंगड पचनसंस्थेला चालना देते तसेच व्यायामानंतर आलेल्या स्नायूंचा थकवा कमी करते. उन्हामुळे थकवा येतो, रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. कालिंगड मुळे थकवा दूर होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
कलिंगडच्या जाती :
सुगंधा कलिंगड – ही जात भारतामध्ये जास्त लोकप्रिय आहे. याशिवाय अर्व्हिस्ट गोल्ड, क्रिम्सन स्वीट, शुगर बेबी, ऑरेंजग्लो, अर्विन, माही, सुगंधा, कामन, स्वर्णरेखा
कलिंगड हे मूळचे दक्षिण आफ्रिकेतील फळ आहे. याचे पिक जास्त करून कर्नाटकात घेतले जाते. अलीकडच्या काही वर्षात महाराष्ट्रातही कलिंगड पिकवली जातात. कोल्हापुरातही अनेक शेतकरी कलिंगडची लागवड करतात. हे नगदी पिक असल्याने याचा उत्पादन खर्च तुलनेने कमी आहे. जसे ऊन वाढेल तसे कलिंगडला मागणी वाढते. यामुळे शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळते. सध्या कलिंगडचा दर आकारमानानुसार २० रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत आहे. कलिंगड उन्हाळ्यात उपयुक्त, आवडणारे आणि सर्वसामान्याना परवडेल असे हे फळ आहे.
————————————————————————————–