सांगली : प्रसारमाध्यम न्यूज
‘शेती ही नशिबाची नव्हे, तर कष्टाची गोष्ट आहे’ हे विधान खरे करून दाखवले आहे आटपाडी तालुक्यातील अवघ्या १७ वर्षाच्या शुभम मरगळे या तरुण शेतकऱ्याने. तरुण वयात जेव्हा इतर मुलं शिक्षण, मोबाईल आणि मनोरंजनात व्यस्त असतात, तेव्हा शुभमने आपल्या कुटुंबासोबत खांद्याला खांदा लावत १५ एकर क्षेत्रावर डाळिंबाची यशस्वी बाग फुलवली आहे. यातून साधारण ७० टन डाळींब उत्पादन घेत वर्षाला १ कोटी रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न घेत आहेत.
सांगलीच्या आटपाडी येथील १७ वर्षीय शुभम मरगळे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला डाळिंब पिक शेती वरदान ठरली आहे. कमी पाण्यात शेतकऱ्यांना अधिकच उत्पादन देणारे पीक म्हणून डाळिंबाच्या शेतीकडे पाहिले जाते. पण या शेतीला देखील अलीकडच्या काळात वेगवेगळी आव्हाने निर्माण झाले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी आणि आत्महत्याग्रस्त देखील झाले आहेत.
शेतातून यशस्वी प्रयोग करून अनेक शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. अर्थात पारंपरिक शेतीला फाटा देत हे उत्पन्न घेतले जात आहे. अशा परिस्थिती देखील आटपाडी मधील अवघ्या १७ वर्षाच्या शुभम मरगळे या तरुण शेतकऱ्याने एक दोन नव्हे तर तब्बल १५ एकर क्षेत्रावर डाळिंबाची बाग फुलवली आहे. या १५ एकर क्षेत्रात तब्बल ४ हजार झाडे आहेत. त्यामुळे शुभमला यंदा ७० टन डाळिंबाचे उत्पादन मिळाले आहे. वडील आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने ही किमया करून दाखवली आहे.
शुभमनं पिकवलेल्या डाळिंबाला प्रतिकिलोला २२५ रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. यातून जवळपास मरगळे कुटुंबाला वार्षिक १ कोटीहून उत्पन्न मिळाले आहे. तर यातून निव्वळ नफा ७o लाख रुपयांचा मिळाला आहे. शुभमने केलेल्या डाळिंब शेतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. योग्य नियोजनातून हे सर्व शक्य होत असल्याचे शुभम मरगळे याने सांगितले.
१५ एकरवर ४ हजार डाळिंबाची झाडे
शुभमने पारंपरिक शेतीच्या पलीकडे विचार करत आधुनिक शेतीचा मार्ग स्वीकारला. त्याने १५ एकर क्षेत्रावर सुमारे ४,००० डाळिंबाची झाडे लावली असून त्यांची देखभाल, सिंचन व्यवस्थापन, औषध फवारणी आणि उत्पादनासाठी आवश्यक सर्व कामे तो स्वतः आत्मविश्वासाने पार पाडतो.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
शुभमने पारंपरिक पद्धतीपेक्षा ड्रिप इरिगेशन, सेंद्रिय खतांचा वापर, कीडनाशकांचे योग्य नियोजन, तसेच पीक संरक्षण उपाय यांचा अवलंब करत शेती अधिक शास्त्रीय पद्धतीने केली आहे. त्यामुळे झाडांची वाढ जोमदार असून उत्पादनाचे प्रमाणही भरघोस आहे.
कुटुंबाचा आधार आणि स्वतःचा जिद्द
शुभमच्या पाठीशी त्याच्या कुटुंबाचा मोलाचा पाठिंबा आहे. वडीलांनी पारंपरिक शेती केली असली तरी शुभमने नवीन विचार व प्रयोगशील दृष्टिकोन ठेवत डाळिंब शेतीला नवसंजीवनी दिली आहे. त्याच्या कष्टाची फळंही त्याला मिळू लागली आहेत – डाळिंबाच्या चांगल्या उत्पन्नामुळे आर्थिक स्थैर्यही लाभू लागले आहे.
तरुणांसाठी आदर्श
शुभम मरगळे याची ही वाटचाल तरुण पिढीसाठी एक प्रेरणा ठरते. केवळ शहरात जाऊन नोकरी करणे हाच यशाचा मार्ग नसून, योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि चिकाटी यांच्या जोरावर शेतीतही मोठे यश मिळवता येते, हे शुभमने दाखवून दिले आहे.
“स्वप्न मोठं असलं की वयाचं बंधन राहत नाही, फक्त मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन असावा लागतो,” असं म्हणणारा शुभम खरंच अनेकांना नवी दिशा देतोय.
——————————————————————————————-






