कोल्हापूर : भारतभूषण गिरी
कोकणचा राजा यावर्षी भलताच रुसलाय ! त्याला बदललेले हवामान मानवले नाही की काय कोण जाणे ! आपली लाही लाही होत असताना त्याला इतकी उष्णता कशी सोसल बरं ! एरवी जानेवारीतच सातासमुद्राकडे जाणारा आणि देशभरात पोहोचणारा हापूस राजा, हंगाम संपायची वेळ जवळ यायच्या वेळी बाजारात डोकावतो आहे. फक्त रसरशीत, मधुरच नव्हे तर कोकणच्या हापूस राजाची चवीची तुलनाच करता येत नाही. म्हणून तर कोकणच्या हापूस राजाची जगभरातील लोक जानेवारीपासूनच वाट पाहत असतात ! कोकणच्या हापूसचे अप्रूप इतके आहे की, या फळाच्या चवीचे कुणालाच मोल करता येत नाही. हापूस मध्ये असलेली चव ही विशिष्ट प्रकारचे हवामान, वैशिष्ट्यपूर्ण जमीन आणि हजारो वर्षापासूनचे झाडांचे बियांणे यामुळेच आहे.
हापूसच्या उत्पादनात चढ उतार असतोच. एखाद्या वर्षी उत्पादन जास्त येते तर काहीवेळा उत्पादन कमी येते. मात्र, यावर्षी तब्बल ५० टक्के उत्पादन घटल्याने बागायतदार हादरले आहेत. केवळ कोकणच्या हापुसचेच नव्हे तर कर्नाटकातील आंब्यालाही हवामानाचा फटका बसला आहे. या आंब्याचे उत्पादनही ५० टक्क्यांनी घटले आहे. कोकणातील काजूही यावर्षी रुसला आहे.
वाढते तापमान धोकादायक –
आंबा पिक वाढीच्या काळात किमान २२ ते २५ अंश सेल्सिअस इतके तापमान आवश्यक असते तर कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस असावे लागते. यावर्षी मार्च महिन्यातच तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस होते. याशिवाय अवेळी पडणारा पाउस, अचानक वाढणारे तापमान, यामुळे किडीला पोषक वातावरण तयार झाले. कीड वाढली. मोहर, पाने, आणि फळांवर या किडीने हल्ला केला.
वाढत्या उष्णतेमुळे झाडांना पाणी कमी पडते. शोषलेले पाणी कडक उन्हामुळे बाष्पोश्वास प्रक्रियेमुळे वातावरणात विरते. यामुळे झाडांना पाणी आणि पोषक सत्व मिळत नाहीत. रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्याने पाने, फुले व फळे यावर किडी प्रभावीपणे हल्ला करतात. या वर्षी थ्रिप्स, अन्थ्राकनोज, देठांचे कुजणे, पावडर मिल्ड्यू या रोगांचा आंबा पिकावर हल्ला झाला. यापैकी थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव आंबा पिकावर जास्त झाला.
आंबा पिकाला तीन टप्प्यात मोहोर येतो. पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरच्या थंडीत मोठ्या प्रमाणात मोहोर येतो. यंदाही आला पण नर फुलांचे प्रमाण वाढल्याने फलधारणा झाली नाही, असे अभ्यासक सांगतात. पहिल्या टप्प्यातील मोहोर पूर्णत: वाया गेला. डिसेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मोहोर आला. सध्या मिळणारे आंबे डिसेंबर मधील मोहोराचे मिळत आहेत. जानेवारीमध्ये येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मोहोर, वाढलेल्या तापमानामुळे आणि मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य किडीमुळे वाया गेला. तापमान वाढीमुळे फळ गळती झाली याचाही परिणाम उत्पादन घटण्यावर झाला.
वृक्षतोडीचा परिणाम-
कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याचे उत्पादन रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात होते. मात्र, देवगडचा -सिंधुदुर्गचा हापूस जगप्रसिद्ध आहे तर रत्नागिरीचा हापूस देशभर प्रसिद्ध आहे. मुंबई -गोवा हा राष्ट्रीय महामार्ग रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जातो. हा महामार्ग तयार करण्यासाठी प्रचंड प्रमाणात वृक्ष तोडण्यात आले आहेत. यामुळे हा महामार्ग रखरखीत झाला आहे. त्या भागातील गारवा नाहीसा झाला आहे. वृक्ष तोडीचा जास्त करून महामार्गाच्या लगतच्या आंबा बागांना आणि काजू बागांना सर्वाधिक फटका बसला आहे. झाडांच्या मुळे फक्त गारवाच मिळतो असे नाही तर झाडांसह वाढणाऱ्या विविध वनस्पतीमुळे फळ धारणेस आणि फळ पक्व होण्यास मदतच होत असते. आंबा उत्पादन घटल्यामुळे याचा अनुभव आंबा बागायतदारांना आला आहे.
दरवर्षी बाजारात फेब्रुवारीमध्ये येणारा आंबा यावर्षी मार्चच्या शेवटी आला. दरवर्षी कोल्हापुरातील बाजारात अडीचशे ते साडेपाचशे रुपये डझन असणारा आंबा आता चारशे ते आठशे रुपये डझन आहे. आंब्याचे उत्पादन घटल्याने आवक कमी आहे. दरही जास्तच आहेत यामुळे हंगाम संपत आला तरी कोकणचा राजा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला नाही.
दिवसेंदिवस वातावरण तापत आहे. गतवर्षीच्या तुलनेत व्यावर्षी उन्हाळा लवकर सुरु झाला आहे. शिवाय तापमानही जास्त आहे. “गुदस्ता हंगाम बारा होता” म्हणजे गेल्यावर्षी हंगाम चांगला होता. असे कोकणातील शेतकरी नेहमी म्हणतात. प्रत्यक्षात तसेच होत आहे. तापमान वाढत आहे आणि याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. हापूस आंबा याचे ठळक उदाहरण आहे. जागतिक तापमान वाढीबरोबर कोकणातील रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात केलेली प्रचंड वृक्षतोड आणि रस्यावरून वाढलेली वाहतूक-वाहनातून बाहेर पडणारे कार्बन डाय ऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साईड यामुळे हवेतील उष्णता वाढते. वाढत्या उष्णतेमुळे कोकणातील प्रमुख पिक हापूस आंबा याच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे कोकणचे आर्थिक गणित विस्कटले आहे.
———————————————————————————————



