कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या युपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२४ च्या परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा फडकला आहे. जिल्ह्यातील चौघेजण सनदी अधिकारी झाले आहेत. यामध्ये आदिती संजय चौगुले, बिरदेव सिध्दाप्पा ढोणे, दिलीपकुमार देसाई व हेमराज हिंदूराव पणोरेकर यांचा समावेश आहे.
बोंद्रे नगर कोल्हापूर येथील जिल्हा परिषद कॉलनीतील हेमराज पणोरेकर, यमगे (ता.कागल) येथील बिरदेव ढोणे, जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील आदिती चौगुले व जांभुळवाडी (ता.गडहिंग्लज) येथील दिलीपकुमार देसाई या चौघांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा फडकला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील मूळचे पुणे येथे रोहन पिंगळे व गोवा येथील ऋषिकेश वीर यांनीही या परीक्षेत यश मिळवले आहे.
यूपीएससीच्या वतीने गेल्यावर्षी १६ जून रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर २० ते २९ सप्टेंबर या कालावधीत मुख्य परीक्षा झाली. जानेवारी ते एप्रिल २०२५ मध्ये मुलाखती झाल्या यानंतर यूपीएससीने मंगळवारी अंतिम निकाल जाहीर केला. त्यानुसार १००९ उमेदवारांची नावांची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. यात सामान्य प्रवर्गातून (३३५) आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रव्रर्गातून (१०९ ) ओबीसी प्रवर्गातून (३१८) अनुसूचित जाती (१६०) अनुसूचित जमाती प्रवर्गातून ८७ उमेदवार पात्र ठरले आहे
देशातील सर्वात अवघड व प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी लख्खं यश मिळवले आहे. या परीक्षेत जयसिंगपूरच्या आदिती चौगुले यांनी ६३ वी रँक यमगेच्या बिरदेव ढोणे यांनी ५५१ वी रँक, जांभूळवाडीच्या दिलीपकुमार देसाई यांनी ६२५ वी रँक तर कोल्हापूरच्या हेमराज हिंदूराव पनोरेकर यांनी ९५२ वी रँक मिळवली आहे. कोल्हापुरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील रोहन पिंगळे यांनी ५८१ वी रँक, तर ऋषिकेश वीर यांची ५५६ वी रँक मिळवली.
———————–
यमगेच्या बिरदेव यांचे शिक्षण सातवीपर्यंतचे केंद्रशाळा तर दहावीपर्यंतचे जय महाराष्ट्र हायस्कूल मधून झाले. दहावीत ९६% गुण मिळवल्यानंतर त्यांनी मुरगुडच्या शिवराज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेतला. बारावीत ८९ टक्के गुण मिळवल्यानंतर त्यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मधून बी. टेक. पूर्ण केले. नागरी सेवेच्या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षेत यश मिळवू शकले नाहीत, तिसऱ्या प्रयत्नात मात्र पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यानी अधिकारी पदाचे स्वप्न पूर्ण केले.
———————–
हेमराज पणोरेकर यांचे प्राथमिक शिक्षण रा.ना. सामानी विद्यालयातून झाले. कागल येथील नवोदय विद्यालयातून त्यांनी दहावीला ८० तर बारावीला ७० % गुण मिळवले. त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून समाजशास्त्र विषयातून पदवी घेतली तर २०२० पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांनी चौथ्या प्रयत्नात यश मिळवले. विशेष म्हणजे त्यांनी कोल्हापुरात राहूनच अभ्यास केला. त्याला विद्या प्रबोधिनी कडून शिष्यवृत्ती मिळत होती. त्यांचे वडील सेवानिवृत्त लिपिक असून आई संगीता गृहिणी आहेत त्यांना राजकुमार पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
————————–
आदिती चौगुले यांनी २०२३ च्या परीक्षेत ४३३ वा रंक मिळाला होता. त्या इंडियन डिफेन्स अकाउंटंट सेवेत रुजू झाल्या होत्या. आता ६३ वी रँक असल्याने जिल्हाधिकारी पदाचे स्वप्न साकार होईल, असे त्यांनी सांगितले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जयसिंगरापुरातील मालू हायस्कूल, माध्यमिक शिक्षण जनता राजा जुनिअर कॉलेजमधून झाले. भालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेऊन त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दरम्यान, त्यांनी समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेऊन नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या. दत्त साखर कारखान्याचे मुख्य अभियंता संजय चौगुले यांच्या त्या कन्या आहेत. मुंबईचे ऋषिकेश बी इलेक्ट्रॉनिक्स असून त्यांनी चौथ्या प्रयत्नात यश मिळवले. त्यांचे आई-वडील शासकीय सेवेत आहेत
———————————————————————–