कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे मैत्री व्हायला फार वेळ लागत नाही. मैत्री, प्रेम, ब्रेकअप या गोष्टी हल्ली सर्वसाधारण वाटू लागल्या आहेत. एखादं घर किंवा कार घ्यायची असेल तर संभाव्य धोके ओळखून नुकसान टाळण्यासाठी त्याचे इन्शुरन्स काढतो. पण, कोणी दोघांमधील नात्याची इन्शुरन्स पॉलिसी काढली असेल तर? ऐकून आश्चर्य वाटेल. पण आता नात्यातही इन्शुरन्श पॉलिसी काढता येणार आहे. यातून इतका लॉयल्टी बोनस मिळेल की याची लग्न खर्चात तुम्हाला मदत होईल. पण ब्रेकअप झाले तर या पॉलिसीनुसार तुम्हाला काय मिळेल? याचा प्रिमियम किती वर्षे भरायचा? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ज्या काळात प्रेम आणि वचनबद्धता लोकांच्या आयुष्यात मागे पडत आहेत, त्या काळात ‘झिकिलोव्ह’ नावाच्या वेबसाइटने जगातील पहिला नातेसंबंध विमा आणलाय. प्रेमाचे नाते अधिक काळ टिकले तर या विम्याची गुंतवणूक त्या पटीमध्ये वाढणार आहे.
भूतबाधा, फसवणूक आणि ‘आमच्यात फक्त मैत्री आहे’ अशा सबबींच्या जगात खरे प्रेम शोधणे पूर्वीपेक्षाही कठीण आहे. मात्र तरीही गेल्या काही दिवसापासून तुम्ही प्रेम करत असाल आणि प्रेम करणाऱ्या व्यक्तीशीच तुमचं लग्न होईल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आता इन्शुरन्स काढू शकता.
आपल्या सोलमेटसोबत लग्न करायचं असेल तर आपल्याला खर्च येऊ शकतो. त्यासाठीची तयारी म्हणून हा इन्शुरन्स आपल्या कामास येईल. यासाठी जोडप्यांना डेटिंग करताना ५ वर्षे वार्षिक प्रीमियम भरावा लागेल. जर त्यांचे नाते टिकून राहिले आणि लग्न झाले तर त्यांना भरलेल्या एकूण प्रीमियमवर १० पट परतावा मिळेल. ही रक्कम कपल त्यांच्या लग्नासाठी खर्च करू शकतात.
विशेष म्हणजे जर तुमचे ब्रेकअप झाले तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. प्रेम संबंधांमध्ये ब्रेकपचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे ज्या जोड्या हे प्रेम टिकवतात त्यांनी लॉयल्टी बोनस म्हणून या रकमेकडे पाहणं गरजेचं आहे, असे आवाहन इन्शुरन्स कंपनीच्या संस्थापकांनी केलंय.
अशा इन्शुरन्समुळे किमान ब्रेकअप होण्याचं प्रमाण कमी होईल आणि संबंधांमधील वाद तंटे सोडवण्याकडे कल असेल असंही संस्थापकांनी सांगितलंय. मात्र घटस्फोटामध्येसुद्धा काहीतरी मिळायला हवं किंवा एखादा रायडर असावा असं काहींचं म्हणणं आहे.
जर प्रेम एक जुगार असेल तर तुम्हाला जिंकण्यासाठी किमान पैसे तरी मिळू नयेत का? असा सवाल करत सोशल मीडियावर सध्या ‘रिलेशनशिप इन्शुरन्स पॉलिसी’ व्हायरल होतेय. आपल्या नाते संबंधांना इन्शुरन्स देण्याची गरज आहे का? हा कपल्सनी एकत्र येऊन ठरवण्याचा विषय आहे.
…………………………………………………………………………………………..






